Headlines

नैरोबीच्या महिलेला पुण्यात डॉक्टरांनी वाचवले प्राण:17व्या वर्षी 200 किलो वजन, 11 शस्त्रक्रिया आणि सेप्सिसशी झुंजल्यानंतर मिळाला ‘पुनर्जन्म’




गेल्या १५ वर्षांत तब्बल ११ शस्त्रक्रियांना सामोरे गेलेल्या नैरोबीतील एका ३२ वर्षीय महिलेचे प्राण पुण्यातील डॉक्टरांनी वाचवले. पोटातील गंभीर संसर्ग, शस्त्रक्रियेनंतर झालेला लीक, सेप्सिस आणि पोषणतत्त्वांची तीव्र कमतरता अशा गंभीर परिस्थितीत तिच्या जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, लॅपरो ओबेसो सेंटर (एलओसी), पुणे येथील बॅरिअॅट्रिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शाह आणि त्यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वी उपचार केले. नैरोबीतील ‘मसाबा’ (नाव बदलले आहे) हिचे वयाच्या १७व्या वर्षी वजन जवळपास २०० किलो होते. वजन कमी करण्यासाठी २०११ मध्ये तिच्यावर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी करण्यात आली. त्यानंतर वजन पुन्हा वाढल्याने २०१५ मध्ये गॅस्ट्रिक बायपास करण्यात आला. २०२० मध्ये दुबईत आणखी एक मोठी शस्त्रक्रिया झाली, ज्यामुळे शरीरात पोषणतत्त्वांची तीव्र कमतरता निर्माण होऊन तिला अशक्तपणा आला आणि ती वारंवार बेशुद्ध पडू लागली. २०२६ मध्ये मुंबईत पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, पाचव्याच दिवशी तिच्या पोटात सुमारे दोन लिटर पू जमा झाला. तो ड्रेनेजने काढला, तरी पुन्हा पू जमा होत राहिला. पोटातील लीक कायम राहिल्याने संसर्ग वाढून सेप्सिस झाला. तिची तब्येत इतकी बिघडली की चालण्यासाठीही तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. जूनमध्ये तिला पुण्यातील एलओसीमध्ये दाखल केले. पूर्वीच्या ११ शस्त्रक्रियांमुळे पोटातील अवयव व ऊती मोठ्या प्रमाणात चिकटल्या होत्या. पोटातील जोड तुटलेला आणि संसर्ग गंभीर असल्याचे तपासणीत दिसून आले. प्रथम तिचे पोषण सुधारले, रक्त व आयर्न दिले, अँटीबायोटिक्सने संसर्ग नियंत्रणात आणला आणि फिजिओथेरपी करण्यात आली. तब्येत स्थिर झाल्यावर अवघड लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो-गॅस्ट्रिक री-अॅनास्टोमोसिस शस्त्रक्रिया करून तुटलेले भाग जोडण्यात आले. ऊतींची जखम भरून येण्याची क्षमता कमी असल्यामुळे एंडोस्कोपीद्वारे स्टेंट बसवला. चार ते पाच वेळा स्टेंटची जागा बदलली. अडीच महिन्यांच्या उपचारांनंतर लीक पूर्णपणे बरा झाला. संसर्ग नियंत्रणात आल्यावर मसाबा पुन्हा नियमित आहार घेऊ लागली. ८६ किलो वजन असताना तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता ती स्वतः चालू शकते आणि दैनंदिन कामेही स्वतंत्रपणे करू शकते, असे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शाह यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *