![]()
पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन परिसरातील जीपीओ पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पुणे पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा पथकांनी दोन्ही कार्यालयांची कसून तपासणी केली. प्राथमिक पाहणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ई-मेलमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला लक्ष्य करण्याची धमकी इंग्रजीमध्ये देण्यात आली होती. संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी तपासात असेही समोर आले आहे की, या ई-मेलमध्ये काही मजकूर तमिळ भाषेतही लिहिलेला होता. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले आहे. ई-मेलचा उगम आणि त्यामागील हेतू शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. धमकीची माहिती मिळाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने कार्यालयातील प्रत्येक मजला, प्रवेशद्वार, पार्किंग परिसर तसेच इमारतीतील सर्व संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी केली. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. सायबर तज्ज्ञांचीही मदत तपासणीदरम्यान कोणतीही धोकादायक वस्तू आढळून न आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. पासपोर्टसाठी आलेल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवून सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवल्या. कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात आल्या. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीचा ई-मेल मिळताच सर्व सुरक्षा प्रक्रिया तातडीने राबविण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने कारवाई केली. प्राथमिक तपासणीत कोणताही धोका आढळून आला नसला तरी, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली असून ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला, तो बनावट होता की त्यामागे कोणते मोठे षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या पासपोर्ट कार्यालयातील सर्व सेवा पूर्ववत सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. ‘माऊली माऊली’चा अखंड जयघोष:नीरा नदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे पवित्र स्नान; पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन पालखी साताऱ्याकडे रवाना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत भावपूर्ण आणि परंपरेने महत्त्वाचा मानला जाणारा नीरा स्नान सोहळा बुधवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. माऊली माऊली’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हजारो वारकरी-भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात विधिवत स्नान घालण्यात आले. या सोहळ्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाकडे प्रस्थान केले. सविस्तर वाचा
Source link
पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी:ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही