![]()
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक जलद गतीने होण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार, मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र शहाणे, धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी अनिल काळे, तिवसासाठी प्रदीप गौरखेडे, दर्यापूरसाठी रमेश बुंदिले, अचलपूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रसाद कोरडे आणि मेळघाटसाठी प्रभुदास भिलावेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासंदर्भात रितसर सरकारी आदेश जारी केला असून, संबंधित व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. या समित्या विधानसभा क्षेत्रस्तरीय असतील. स्थानिकांच्या मते, शासनाचा हा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सातत्याने पाणंद रस्त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी महसूल मंत्र्यांसमोर मांडत होते. ही बाब लक्षात घेऊन बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या माध्यमातून या योजनेची कार्यपद्धती अधिक सोपी व सुलभ केली आहे. आता स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी या सह-अध्यक्षांना अधिकृतपणे पाठपुरावा करता येणार आहे. महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना या समित्यांमध्ये सह-अध्यक्षांचा तत्काळ समावेश करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Source link
'मुख्यमंत्री बळीराजा' योजनेसाठी मतदारसंघनिहाय समित्या:महसूल मंत्र्यांच्या आदेशाने सहअध्यक्षांची नियुक्ती