![]()
सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच, पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. १३ जुलैपर्यंतच्या महसूल मंडळनिहाय अहवालानुसार, तालुक्यातील ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ९३ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, ही टक्केवारी ९४.६६ टक्क्यांवर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने उगवलेली कोवळी पिके आता पाण्याअभावी करपू लागली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती आहे. महसूल मंडळनिहाय पाहता पळोद, भराडी, बोरगाव बाजार, शिवना, गोळेगाव आणि अंभई परिसरात पेरणी पूर्ण झाली असली, तरी सर्वच भागात आता दुष्काळी परिस्थितीसारखे चित्र आहे. अनेक शेतांमधील मातीचा वरचा थर कोरडा पडल्याने पिकांना तडे जात आहेत. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे, खत, मजुरी आणि ट्रॅक्टर मशागतीसाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. यंदा जूनअखेरीस व जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, कोवळी रोपे तीव्र उन्हामुळे सुकू लागली आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सर्वाधिक पसंती दिली असून, ४० हजारहेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. दुबार पेरणीमुळे पुन्हा आर्थिक भुर्दंड बसणार
Source link
पावसाची दडी:सिल्लोडमध्ये 93 हजार हे. पिके संकटात, खरिपाची 94 टक्के पेरणी, आता दुबार पेरणीचे संकट गडद