![]()
छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गोदावरी हॉटेलजवळ धावत्या बसला आग ही घटना छत्रपती संभाजीनगर-बीड महामार्गावरील पिंपळगाव पांढरी फाटा परिसरात, गोदावरी हॉटेलजवळ सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीकडे निघालेली एसटी बस पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसह प्रवाशांना घेऊन जात होती. कारचालकाच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना बसच्या मागून कारने प्रवास करणारे श्रीगोंदा येथील प्राचार्य अमोल नागवडे आणि त्यांच्यासोबत विघ्ने दिलीप, गणेश शितोळे व वैभव पवार यांनी बसच्या खालून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना पाहिल्या. त्यांनी तत्काळ बसला ओव्हरटेक करून चालकाला बसला आग लागल्याची माहिती दिली. यावेळी चालकाने कोणतीही घाबरगुंडी न उडवता बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली. चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सहकार्याने अवघ्या काही क्षणांत सर्व 38 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पाच मिनिटांत बस जळून खाक प्रवासी खाली उतरल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. बस पेटल्याचे दृश्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवाशांचा जीव वाचला या बसमधील काही प्रवासी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघाले होते. वेळेत सर्वांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही क्षणांचा उशीर झाला असता तर भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट बसला नेमकी कशामुळे आग लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, चालकाचे प्रसंगावधान आणि कारमधील चौघा नागरिकांची वेळेवर दिलेली सूचना यामुळेच अनेकांचे प्राण वाचले.
Source link
धावत्या एसटी बसला भीषण आग:संभाजीनगरहून इचलकरंजीला जात होती बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका