Headlines

अल्पवयीन कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू:मंडप उतरवताना घडली दुर्घटना; व्यावसायिकावर गुन्हा दाखल




पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर मंडप उतरवताना विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय अल्पवयीन कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ३ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंडप व्यावसायिकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत अल्पवयीन कामगाराचे नाव यश प्रितियानी (वय १६) असे आहे. यशचे मामा धनंजय कृष्णा मापुसकर (वय ४९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, मंडप व्यावसायिक आसीफ कासम सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ एका विवाह समारंभासाठी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंडप व्यावसायिक आसीफ सय्यदकडे यश प्रितियानी हा काम करत होता. यश अल्पवयीन असतानाही त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करून घेतले जात होते. ३ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास मंडप उतरवण्याचे काम सुरू असताना यशला विजेचा धक्का बसला. तो तात्काळ बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मंडप व्यावसायिकाने सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नसल्याचे आणि त्याच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे यशचे मामा मापुसकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चौगुले करत आहेत. डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी, दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाघोलीतील केसनंद परिसरात फिरायला निघालेल्या एका पादचाऱ्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. सुधीर हिरामण गायकवाड (वय ५७, रा. केसनंद-थेऊर रस्ता, केसनंद, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत गायकवाड यांचा मुलगा स्वप्नील (वय ३३) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गायकवाड हे दररोज सकाळी फिरायला जायचे. १५ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते केसनंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी गोल्डन बारजवळ एक डंपर पाठीमागे येत होता. डंपर चालकाने वेगात डंपर पाठीमागे नेला. डंपरच्या चाकाखाली सापडून गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *