![]()
पैशांच्या व्यवहारातून 26 वर्षीय विवाहितेची गळा आवळून हत्या करून तिच्यासोबत असलेल्या अवघ्या 14 महिन्यांच्या निष्पाप मुलालाही वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर येथील रहिवासी सायमा सलमान चौधरी हिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकोरी शिवारातील विहिरीत सापडला असून, तिच्या चिमुकल्या मुलाचा अद्याप शोध सुरू आहे. याप्रकरणी वावी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक चौकशीत पैशांच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजापूर येथील अब्दुल लतीफ युनूस चौधरी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. सायमा आणि तिचा 14 महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान सायमाच्या घरातून लाखो रुपयांच्या बँक व्यवहारांच्या पावत्या मिळाल्या. या व्यवहारांचा संबंध नातेवाईक नुरजमा अहमद चौधरी याच्याशी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला आणि त्याचा मित्र सद्दाम ऊर्फ आमीर अहमद चौधरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. बँक व्यवहारांच्या पावत्यांमुळे उलगडला गुन्हा कसून चौकशीत संशयितांनी पैशांच्या वादातून सायमाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पैसे परत देण्याच्या बहाण्याने सायमाला बोलावण्यात आले. त्यानंतर कारमध्येच तिचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाशिक जिल्ह्यातील कनकोरी शिवारातील विहिरीत टाकण्यात आला. कपडे, नथ आणि घड्याळावरून पटली ओळख दरम्यान, 6 एप्रिल 2026 रोजी कनकोरी शिवारातील एका विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. एमआयडीसी वाळूज आणि वावी पोलिसांनी संशयितांना घटनास्थळी नेल्यानंतर तपासाला वेग आला. मृत महिलेच्या अंगावरील कपडे, नथ, घड्याळ तसेच ती बेपत्ता होण्याच्या दिवशी काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे तिचे वडील आणि पती यांनी मृतदेहाची ओळख सायमा चौधरी अशी पटवून दिली. 14 महिन्यांच्या निष्पाप बालकाचाही निर्दयीपणे जीव घेतला या प्रकरणातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, आरोपींनी केवळ सायमाची हत्या करून थांबले नाहीत, तर तिच्यासोबत असलेल्या 14 महिन्यांच्या साजीम या निष्पाप बालकालाही वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वावी पोलिसांत खुनाचा गुन्हा; तपास सुरू या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी वाळूज आणि वावी पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद एका सुखी संसाराचा अंत करणारा ठरला असून, निष्पाप चिमुकल्यालाही जीव गमवावा लागल्याने या घटनेने छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. हेही वाचा… संभाजीनगर-इचलकरंजी बसला भीषण आग:चालकाच्या प्रसंगावधानामुळे 38 प्रवाशांची सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पैशांच्या वादातून माय-लेकाची निर्घृण हत्या:विवाहितेचा गळा आवळला, तर 14 महिन्यांच्या चिमुकल्यालाही वाहत्या पाण्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले