![]()
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’ पाडण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. राजू शेट्टी यांनी महामार्गाच्या आकडेवारीचा पाढा वाचत सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीस ८०२ किलोमीटर लांबीचा ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपुर्ण राज्यातील या महामार्गाचा १ किलोमीटरचा खर्च १०७ कोटी २३ लाख रूपये होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवला आहे, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. ट्रम्प यांचा डॉलर रस्त्यावर टाकणार आहात का? याचाच अर्थ ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला. थोडक्यात माण -खटाव या माळरानावरून जाणा-या रस्त्याच्या १ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये इतका खर्च केला जाणार आहे. देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्ही १ किलोमीटर रस्त्यासाठी २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहात नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॅालर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. जनतेच्या खिशावर दरोडा टाकताय तुमची भ्रष्ट्राचारी महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून ७० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात. कारण हा सारा पैसा जनतेने व्याजासहित टोल रूपाने परत करायचा आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. नेमका काय आहे शक्तीपीठ महामार्ग वाद? दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग (नागपूर ते गोवा) हा राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, याला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. हा महामार्ग सुपीक जमिनीतून जात असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आधीच कोल्हापूर ते गोवा दरम्यान एक मार्ग उपलब्ध असताना नवीन शक्तीपीठ महामार्गाची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रकल्पाचा खर्च ज्या प्रकारे वाढत आहे, त्यावरून विरोधक आणि शेतकरी संघटनांनी यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला आहे. ‘विनाशकारी’ महामार्ग रद्द करावा, यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सध्या मोठे आंदोलन उभे राहिले आहे.
Source link
देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल