![]()
गंगापूर विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलिसांनी मोहीम राबविली आहे. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम आखून ३५ न्यायालयीन वॉरंटपैकी २७ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. गंगापूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या विविध खटल्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश असतानाही संबंधित आरोपी सतत गैरहजर राहत होते. न्यायालयाच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने न्यायालयाने या आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. गंगापूर पोलिसांनी विशेष पथके तयार केली. या पथकाने २७ वॉरंटधारकांना ताब्यात घेतले. ही मोहीम सहायक पोलिस निरीक्षक विनायक पाटील, विठ्ठल झांजुर्णे, युसूफ पठाण, अमित पाटील, विजय पारखे, मनोज नवले, मनोज घोडके, पोलीस नाईक विठ्ठल जाधव, कॉन्स्टेबल संदीप घुसंगे, अनिरुद्ध शिंदे, अमोल करवंदे, नारायण दुल्हन, विष्णू बापते, अश्विनी गायकवाड, रेणुका धारकर यांच्या पथकाने राबविली. कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या २७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाई सुरुच ठेवण्याचा गंगापूर पोलिसांचा इशारा न्यायालयीन आदेशांचा अवमान करणाऱ्यांवर आणि तारखांना दांडी मारणाऱ्यांवर यापुढेही अशीच कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा गंगापूर पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, उर्वरित ८ फरार वॉरंटधारक आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
Source link
कारवाई:कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या 27 जणांवर गंगापूर पोलिसांची धडक कारवाई