![]()
.
नागद येथील बसस्थानक परिसरातील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडून ४० हजार रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी कुलपे न तोडता कटरने कडीकोयंडे कापून चोरी केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नारायण गीते यांनी दिली.
या चोरीत योगेश तायडे यांच्या देशी दारूच्या दुकानातून पाच दारूचे बॉक्स व चार हजार मुक्तानंद पाटील यांच्या अंबिका हॉटेलमधून वीस हजार, तर महेंद्र राजपूत यांचे मेडिकल आणि शेख सलमान यांचे मसाल्याचे दुकान फोडण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच सपोनि नारायण गीते, अजय मुतिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागद ही मोठी बाजारपेठ असून येथील पोलिस चौकीत दोन कर्मचारी आहेत व रात्री गस्त नसते. त्यामुळे येथे स्वतंत्र उपपोलिस ठाणे उभारून गस्त वाढवावी, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत व नाना अहिरे यांनी केली आहे.