Headlines

मुंबईत पुन्हा बेस्टचा भीषण अपघात:मानखुर्दमध्ये भरधाव बस दुभाजकाला धडकली, एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू




मुंबईतील मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस थेट दुभाजकाला धडकल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचे चालक आणि वाहक देखील जखमी झाले असून, वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नेमका अपघात कसा घडला? आज (सोमवारी) सकाळी ९.१४ वाजेच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर हा भीषण अपघात घडला. ५०१ क्रमांकाची बेस्ट बस या मार्गावरून भरधाव वेगात जात होती. यावेळी अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस अत्यंत जोराने रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. पादचाऱ्याला चिरडले, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू ज्या वेळी बस दुभाजकाला धडकली, नेमक्या त्याच वेळी भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५) हे दुभाजकाजवळ उभे होते. या भरधाव बसची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका क्षणाच्या दुर्घटनेने या वृद्धाचा नाहक बळी गेला आहे. चालक आणि वाहक जखमी या धडकेची भीषणता इतकी मोठी होती की, बसमधील कर्मचारीही यात जखमी झाले आहेत. बसचे ४१ वर्षीय वाहक वैभव वाघमारे यांना दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, ५१ वर्षीय बसचालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तपास सुरू ऐन सकाळच्या आणि कामावर जाण्याच्या वर्दळीच्या वेळी हा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. बसचे ब्रेक फेल झाले होते की चालकाचे नियंत्रण सुटले, या अपघातामागील नेमक्या कारणाचा तपास आता पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हेही वाचा.. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: इथेनॉल टँकर पलटल्याने सुरू होती एकेरी वाहतूक, ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; 6 जणांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले. तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *