Headlines

शिर्डीत खळबळ!:साईबाबा मंदिराच्या गेटसमोरच थरार, फळ विक्रेता महिलांनी चाकूने वार करत दुसऱ्या महिलेला संपवले




शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर रविवारी रात्री एका हत्याकांडाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. फळे विकण्यासाठी उभे राहण्याच्या किरकोळ वादातून चार ते पाच महिलांनी एका ३० वर्षीय फळ विक्रेता महिलेची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे शिर्डीत महिलांचे गुंडराज वाढले आहे का, असा संतप्त सवाल महिलेच्या पतीने उपस्थित केला. भरगर्दीत चाकूने सपासप वार मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) असे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी रात्री साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर नेहमीप्रमाणे भाविकांची आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी होती. याच वर्दळीच्या ठिकाणी स्टिकर आणि फळे विकणाऱ्या चार ते पाच महिलांच्या एका गटाने जयश्री यांच्यावर अचानक धारदार चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. आरोपी महिलांनी त्यांच्यावर सपासप वार केल्याने जयश्री गंभीर रित्या जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्री यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्येचे नेमके कारण काय? या हत्याकांडामागे कोणतेही मोठे कारण नसून, रस्त्यावर फळे विकण्यासाठी उभे राहण्याच्या जागेवरून हा वाद सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी महिलांनी थेट कायदा हातात घेत दुसऱ्या महिलेचा भररस्त्यात बळी घेतला. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात मोठा गोंधळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन आरोपी महिलांना बेड्या या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी शिर्डी शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटेतील दोन मुख्य आरोपी महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र असून इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, अलीकडच्या काळात मंदिर परिसरात गुंड प्रवृत्तीच्या तरुणांसोबतच आता महिला विक्रेत्यांचीही दहशत वाढत आहे. किरकोळ कारणांवरून थेट चाकू हल्ले होऊ लागल्याने, “शिर्डीत आता महिलांचा गुंडराज सुरू झालाय का?” असा सवाल महिलेच्या पतीने आणि स्थानिक नागरिकांनी विचारला. या वाढत्या गुन्हेगारीमुळे साई भक्तांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हेही वाचा.. अमरावतीमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांड:बसस्थानक परिसरात दोन तरुणांची निर्घृण हत्या; हत्येचे कारण अस्पष्ट
अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एका भीषण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *