![]()
नागपूर मेट्रो रेल टप्पा-2 अंतर्गत कन्हान नदी मेट्रो स्थानक ते कन्हान शहरादरम्यानच्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत केली जाईल. या विस्तारासाठी एकूण 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहरादरम्यान सुमारे 1.40 किलोमीटर लांबीचा पूर्णतः उन्नत मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. कन्हान शहरात एक नवीन उन्नत मेट्रो स्थानकही बांधले जाईल. उपनगरीय क्षेत्रातील नागरिकांना जलद, शाश्वत आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या विस्तारामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाच्या कामाचा कालावधी मार्च 2026 ते डिसेंबर 2027 असा प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये केंद्र व राज्य शासनाचा समभाग, बिनव्याजी दुय्यम कर्ज आणि वित्तीय संस्थांचे कर्ज यांचा समावेश असेल. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व पुनर्वसनासाठी लागणारा 27.10 कोटी रुपयांचा खर्च राज्य शासन दुय्यम कर्जाच्या स्वरूपात महामेट्रोला उपलब्ध करून देईल. नागपूर महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन, 2025 मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याच्या शिफारशीनुसार हा विस्तार मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कन्हान परिसरातील प्रवाशांना नागपूर शहराशी थेट आणि वेगवान मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळण्यास मोठी मदत होईल.
Source link
कन्हान मेट्रो विस्ताराला राज्य शासनाची मंजुरी:310 कोटींच्या प्रकल्पाची अंमलबजावणी 'महामेट्रो' करणार