![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील काशीतांडा येथील गरोदर महिलेस रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. याप्रकरणी संबंधितांकडून खुलासे मागविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औंढा नागनाथ तालुक्याती काशीतांडा येथील गरोदर महिला इंदूर राठोड यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना तातडीन उपचारासाठी रुग्णालयात जाणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला असतांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राठोड यांना खाजगी वाहनाने प्रसूतीसाठी आणले जात असतांना वाहनातच त्यांची प्रसूती झाली. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना त्यांना थेट हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी आणले होते. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाले आहेत. यापूर्वी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रुग्णवाहिका मिळाली नसल्याने अर्भकाला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी होती. त्यानंतर काशीतांडा येथील महिलेस रुग्णवाहिका मिळाली नाही. सुदैवाने राठोड यांची प्रसूती सुखरूप झाली. या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या सर्व प्रकाराची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सांगितले. या प्रकरणात लोहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवले जाणार आहेत. तसेच रुग्णवाहिका कशामुळे उपलब्ध नव्हती, चालक कुठे होता या सर्व प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. शेळके यांनी स्पष्ट केले.
Source link
रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसूती:औंढा नागनाथमधील प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश