![]()
विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या बुलेटिननुसार, मध्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. 21 ते 23 जुलै दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 24 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरून बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमानाबाबत माहिती देताना हवामान विभागाने स्पष्ट केले की, पुढील 24 तासांत विदर्भातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होईल. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसून, त्यानंतरच्या दिवसांत पुन्हा हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
विदर्भात पाऊस सक्रिय:पुढील 3 दिवस मुसळधार पावसासह मेघगर्जना-विजांच्या कडकडाटाची शक्यता