Headlines

धावत्या रेल्वेत महिलेची पर्स चोरणारे दोघे ताब्यात:इगतपुरी लोहमार्ग पोलिस, सुरक्षाबलाची कारवाई‎




इगतपुरी मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त तपासातून पर्दाफाश केला. या प्रकरणात एका आरोपीसह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ५ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत अधिक माहिती अशी की, ८ जून रोजी नुसरत फातिमा कमरुद्दीन मुंशी या पतीसमवेत नांदेडहून मुंबईकडे राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यान त्यांची पर्स चोरीला गेली. इगतपुरी रेल्वे स्थानकात उतरल्यावर पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार आणि रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बाबुलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे सुरू करण्यात आला. नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दोन संशयित पर्स लांबवताना दिसून आले. पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक निकम आणि पथकाने तपास करून फैजल फिरोज खान याला अटक केली. आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित मुद्देमालही लवकरच हस्तगत करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोन्याचे दागिने व मोबाईलसह आरोपीला ताब्यात घेतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, बाबुलाल चौधरी, दीपक निकम आदी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *