![]()
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शरद पवारांची पंतप्रधानांसोबतची भेट आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड भाष्य केले. फडणवीसांचा वाढदिवस आणि अजित पवारांना आदरांजली देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा केवळ सेलिब्रेशन न करता, राज्यभरात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि पॅन-आधार कार्ड वाटपासारखे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत, असे नार्वेकर म्हणाले. तसेच, आज स्वर्गीय अजित दादा पवार यांचीही जयंती असून, राज्यासाठी आणि देशासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगत नार्वेकरांनी त्यांना भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. खुद्द विधानसभा अध्यक्षांनीही या शिबिरात रक्तदान करत सहभाग नोंदवला. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी देताना नार्वेकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची आजपासून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असून, थकबाकी माफ होण्यामुळे राज्यातील लाखो बळीराजांना याचा थेट फायदा होणार आहे. शरद पवार-पंतप्रधान मोदी भेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीला एनडीएमध्ये (NDA) घेण्याच्या चर्चेवर बोलताना नार्वेकर म्हणाले की, “संसदेत नेते एकमेकांना भेटतच असतात. राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी चांगले संबंध जपणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, कोणाशी युती करावी आणि कोणाला एनडीएमध्ये घ्यावे, यासंदर्भातील अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेईल.” नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनीही संसद अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसने आंदोलन छेडले. ‘राहुल गांधींचे कृत्य लोकप्रतिनिधीला न शोभणारे’ दिल्लीत ‘नीट’ आणि इतर प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, “ज्यांचा संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास आहे, ते कधीही हिंसेचा वापर करणार नाहीत. कोणत्याही प्रश्नावर असंविधानिकरीत्या प्रदर्शन करण्यापेक्षा, लोकसभा आणि विधानसभा यांसारख्या संविधानाच्या मंदिरांमध्ये चर्चा घडवून आणणे अधिक महत्त्वाचे आहे. विरोध करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे, पण तो लोकशाहीच्या चौकटीतच असला पाहिजे.” संसद अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर केलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दांत टीका करत नार्वेकर म्हणाले, “संसदेचे सत्र सुरू असताना ते सोडून बाहेर आंदोलन करणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभणारे कार्य नाही. अधिवेशन चालवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात सभागृहातच लोकांचे प्रश्न मांडणे अधिक योग्य राहील.” हेही वाचा.. दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात: म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. सविस्तर वाचा जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा
Source link
सत्र सुरू असताना संसदेबाहेर आंदोलन लोकप्रतिनिधीला शोभत नाही:राहुल गांधींच्या आंदोलनावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका