![]()
स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक धक्कादायक आणि हादरवणारे कारनामे समोर आले आहेत. अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने भाविकांची केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर त्यांच्या अत्यंत वैयक्तिक KYC सारख्या कागदपत्रांचा गंभीर गैरवापर केल्याचेही उघड झाले आहे. भक्तांच्या KYC कागदपत्रांचा असा झाला गैरवापर ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या अभियोग तक्रारीनुसार तीर्थयात्रेचे तिकीट बुकिंग किंवा धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने खरातने आपल्या भक्तांकडून त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारखी महत्त्वाची केवायसी (KYC) कागदपत्रे जमा केली. मात्र, या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने भक्तांच्या नकळत अनेक बोगस बँक खाती उघडली. राहाता येथील ‘समता नागरी सहकारी पतसंस्थे’त सुमारे 60 बोगस बँक खाती आणि 48 विशेष बचत खाती, तर सिन्नरमधील ‘जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे’त 34 मुदत ठेव व चालू खाती उघडण्यात आली. बोगस सह्या आणि बेनामी व्यवहार यातील बहुतांश (32) खाती बेनामी असून ती खातेदारांच्या संमतीविना उघडण्यात आली होती. त्यासाठी काही भक्तांच्या बनावट सह्याही करण्यात आल्या. ही खाती स्वतःच्याच नियंत्रणाखाली असल्याचे खरातने चौकशीत कबूल केले आहे. 100 रुपयांचे चिंचोके आणि प्लास्टिकचे साप! खरातने आपल्या भक्तांच्या मनात मृत्यू, काळी जादू आणि देवाच्या कोपाची भीती निर्माण करून त्यांना सामान्य वस्तू अवाजवी किमतीत विकल्याचा खळबळजनक खुलासा ईडीने केला आहे. खरातच्या माजी सहाय्यकाने दिलेल्या जबाबानुसार, बाजारात 100 रुपये किलोने मिळणाऱ्या सामान्य चिंचोक्यांना खरात ‘दैवी शक्ती असलेले बीज’ सांगून विकत असे. भक्ताच्या आर्थिक क्षमतेनुसार या एका बीजाची किंमत 10 हजार ते तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत लावली जात असे. 7 लाखांच्या मधाचे बिंग फुटले एका फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकाला अत्यंत दुर्मिळ आणि ‘औषधी व आध्यात्मिक गुणधर्म’ असल्याचा दावा करून साधे मध तब्बल ७ लाख रुपये प्रति लिटर दराने विकले गेले, जे बाजारात केवळ काही शे रुपयांना मिळते. पूजेच्या ठिकाणी प्लास्टिकचे साप आणि कृत्रिम वाघ ठेवून तो भक्तांना तिथे ‘दैवी चमत्कार’ होत असल्याचा भास निर्माण करत असे. यातून तो लोकांची आर्थिक लूट करत असे. लैंगिक शोषण आणि बेहिशोबी मालमत्ता खरातचे प्रताप केवळ आर्थिक लुटीपुरते मर्यादित नाहीत. मंत्रतंत्राच्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली स्वतःकडे येणाऱ्या महिला भक्तांना तो गुंगीचे औषध मिसळलेला ‘प्रसाद’ किंवा पेय द्यायचा आणि त्या अर्धवट गुंगीत असताना त्यांचे लैंगिक शोषण करायचा, असा आरोप आहे. या प्रकरणातील काही कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. महिलांच्या या असहाय्यतेचा आणि भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेक वर्षे पैसे उकळल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यातूनच त्याने तब्बल 42.88 कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केली, जी आता ईडीच्या रडारवर आहे. खरातचा इन्कार ईडीने केलेले सर्व आरोप अशोक खरातने फेटाळून लावले आहेत. “मी कोणाकडूनही सक्तीने पैसे उकळले नाहीत, भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या या ऐच्छिक देणग्या आहेत आणि मी आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही,” असा दावा त्याने केला आहे. मात्र, या देणग्यांचे स्रोत, रेकॉर्ड आणि हा पैसा स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी कसा वळवला, याचे कोणतेही पुरावे तो तपास यंत्रणेला देऊ शकलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ईडीची मोठी कारवाई: कोट्यवधींची मालमत्ता जप्त ईडीने खरातच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबाड हाती लागले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे: रोख रक्कम: 13.92 कोटी रुपये विदेशी चलन: 5.18 लाख रुपये सोने-चांदीचे दागिने: 1.12 कोटी रुपये बँक ठेवी: 2.60 कोटी रुपये वाहने: आलिशान मर्सिडीझ-बेंझ कार एकूण जप्त/गोठवलेली चल मालमत्ता: 17.70 कोटी रुपये तात्पुरती जप्त केलेली स्थावर मालमत्ता: 19.20 कोटी रुपये ईडीने आरोपपत्रासोबत आर्थिक व्यवहारांची सर्व कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि मालमत्ता जप्तीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. या 3000 पानांच्या आरोपपत्रातील पुराव्यांमुळे आता या भोंदू बाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, विशेष न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सुमारे अडीच काेटींची जमीन खरेदी करून ठेवल्याचे भूसंपादनाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. खरातने साेलापूर जिल्ह्यातील कळमण गावात ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्याच ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे. मार्च २०२४ मधील व्यवहारानुसार कळमणच्या गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर (सुमारे ११ एकरांपेक्षा जास्त) जमीन खरातच्या नावावर घेतले. खरेदीखतावरील किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये आहे. अशोक खरातची तब्बल २ हजार कोटींची मालमत्ता आणि त्यात राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची छुपी गुंतवणूक पाहता आता चौकशीसाठी थेट ‘ईडी’ ची एन्ट्री झाली. ईडीच्या तपासामुळे खरातला माहिती पुरवणारे वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या काळ्या धंद्यात ‘स्लिपिंग पार्टनर’ असलेले अनेक पांढरपेशे रडारवर आले. भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश? अशोक खरातला आपल्या कृत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागताच त्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पीडित महिलांनी न्यायासाठी सुरुवातीला एका आमदाराची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली होती, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित आमदाराने पीडितांना मदत करण्याऐवजी उलट खरातलाच या तक्रारीची पूर्वसूचना दिली, ज्याचा फायदा घेत खरातने हे प्रकरण दाबण्यासाठी उलट पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अन्यायापुढे हार न मानता पीडितांनी दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली, ज्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि या संपूर्ण अत्याचारकांडाला वाचा फुटली. लोकप्रतिनिधींची खंबीर साथ आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच या भोंदूबाबाचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले असून पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंचा मुंबई महापालिकेलाही दणका!:दररोज 7 ते 8 हजार जण जेवण करणारे BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; FDAची धडक कारवाई
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाया राज्यभर सुरूच असून, आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयालाही बसला आहे. FDAच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकत तपासणी केली आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीन सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली भोजन व्यवस्था तात्पुरती बंद झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड:100 रुपयांचे चिंचोके विकले लाखोंना, भक्तांच्या पॅन-आधारचा गैरवापर करून उघडली बोगस खाती!