Headlines

मुंबईतील पवईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात:चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली, 7 प्रवासी जखमी




पवई परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक मोठी अपघात घडली. विक्रोळी आगारातून वांद्रे बस स्थानकाकडे (पश्चिम) जात असलेल्या ‘बेस्ट’च्या एका इलेक्ट्रिक बसची रस्ता दुभाजकाला (Road Divider) जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात बसमधील किमान ७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘बेस्ट’च्या ट्रॅफिक कमांड अँड कंट्रोल सेंटरने दिलेल्या अपघाताच्या अहवालानुसार, ही घटना गुरुवारी सकाळी ११:०५ वाजताच्या सुमारास पवई विहार संकुलजवळ घडली. बस क्रमांक ‘८६८८’ ही मार्ग क्र. ‘A-422/36’ वरून विक्रोळी डेपोकडून वांद्रे स्थानकाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताचे कारण काय? अपघातानंतर बस चालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस चालवत असताना डाव्या बाजूने एक कार वेगाने पुढे येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. चालकाचे लक्ष त्या कारवर केंद्रित झाल्यामुळे आणि धडक वाचवण्याच्या प्रयत्नात बस अचानक उजव्या बाजूला झुकली अन् थेट रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकाला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की बसमधील ७ प्रवासी जागीच जखमी झाले. जखमींवर साकिनाका येथे उपचार; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच वेट लीज डेपो मॅनेजर किशोर शिंदे यांच्या सूचनेनुसार बस वाहकाने (Conductor) सर्व जखमी प्रवाशांना साकिनाका येथील ‘पॅरामाऊंट हॉस्पीटल’मध्ये तातडीने उपचारासाठी दाखल केले. जखमी प्रवाशांवर त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांच्या दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये मरोळचे बस निरीक्षक (No. 097343), अपघात निरीक्षक (No. 73), कुर्ला डेपो मॅनेजर तिवारी, मरोळचे सहाय्यक डेपो मॅनेजर गेंगे आणि अपघात अधिकारी जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. वाहतूक काही काळ खोळंबली या अपघातामुळे पवई विहार संकुल परिसरातील वाहतूक काही काळासाठी मंदावली होती. मात्र, अपघाताची नोंद घेतल्यानंतर आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. चालक, रस्त्याची स्थिती आणि इतर घटकांची कसून चौकशी केल्यानंतरच अपघाताचे अचूक कारण स्पष्ट होईल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हे ही वाचा… संभाजीनगरातील ‘उत्तम उपहार गृह’वर FDA ची कारवाई:इमरतीसाठी प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित, तपासणीत आढळल्या त्रुटी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर राज्यात दुधातील भेसळ, बेकायदेशीर गुटखा आणि अस्वच्छ उपाहारगृहांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेची मोठी झळ आता छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सनाही बसू लागली आहे. शहराला जिभेवर रेंगाळणाऱ्या ‘इमरती’ची ओळख करून देणाऱ्या अतिशय जुन्या अन् नामांकित ‘मे. उत्तम उपहार गृह’वर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनाने या उपाहारगृहाचा परवाना तातडीने निलंबित करत आस्थापना बंद केली आहे. सविस्तर वाचा… रात्रंदिवस अभ्यास, पण निकालाने धक्का:बीडच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाची NTA ला नोटीस, आठवडाभरात उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश देशभरात नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या निकालामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ला नोटीस बजावत संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *