![]()
अमरावती स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) शहरातील १२ वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गाठीमुळे रुग्ण बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते, त्यामुळे तिला अन्न घेण्यास अडचण येत होती तसेच गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. श्वास घेणे आणि चालणेदेखील तिच्यासाठी कठीण झाले होते. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने घेतला. त्यामुळे या मुलीला एकप्रकारे नवा जन्म मिळाल्याचा आनंद तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही रुग्ण बालिका तिच्या पालकांसह तपासणीसाठी रुग्णालयात आली होती. प्राथमिक तपासण्या करून तिला भरती करण्यात आले. सोनोग्राफी व सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या स्वादुपिंड (पॅनक्रियाज) या ग्रंथीत ‘स्युडोसिस्ट ऑफ पॅनक्रियाज’ नावाची मोठी गाठ आढळून आली. या गाठीमध्ये सुमारे दोन लिटर द्रव साचलेला होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ.मंगेश मेंढे यांच्याशी सल्ला करून तिच्या पोटाची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पीडियाट्रिक सर्जन डॉ. उषा गजभिये, बधिरीकरण तज्ञ डॉ. संजय महातपुरे, डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. नितीन बरडिया, डॉ. नम्रता भस्मे, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, अधीसेविका चंदा खोडके, इन्चार्ज सिस्टर विद्या चुडे, श्रद्धा पटोरकर, ज्योती गोंडसे आदींनी या शस्त्रक्रियेमध्ये मोलाचे योगदान दिले. या शस्त्रक्रियेदरम्यान पोटाचा पुढील व मागील भाग कापून पुन्हा जोडावा लागतो, जी अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. परंतु रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. सारे काही विनामुल्य झाले एकीकडे गुंतागुंतीचा आजार, दुसरीकडे गरीबी अशा पेचात कुटुंब अडकले होते. परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे असल्याने डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. अशाप्रकारे ही शस्त्रक्रिया ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य करण्यात आली आहे. त्यासाठीरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांंचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. सध्या रुग्ण पूर्णपणे बरी असून, तिला लवकरच सुटी देण्यात येणार आहे.
Source link
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; सुपरच्या डॉक्टरांना यश:स्वादुपिंडातील गाठीच्या त्रासामुळे शहरातील 12 वर्षीय मुलगी झाली होती त्रस्त