Headlines

चांदवडला 24 शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल्सची चोरी:रायपूर आणि भडाणे फाटा परिसरातील प्रकार




चांदवड तालुक्यातील रायपूर, भडाणे फाटा आणि समिट स्टेशन परिसरात दि. १९ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल २४ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारी व सोलर पंपांच्या केबल्स‌्ची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे. घटनेनंतर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, विद्युत मोटारी व सोलर पंपांच्या बिलांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अद्याप अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी शेतकऱ्यांकडे मोटारी व सोलर पंपांची बिले मागितली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोटारी जुन्या असल्याने त्यांची बिले उपलब्ध नाहीत, तर सोलर कंपन्यांकडूनही अधिकृत बिले दिली जात नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भडाणे, रायपूर आणि समिट स्टेशन परिसरातून रेल्वे मार्ग जात असल्याने या भागात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मनमाड शहर जवळ असल्याने तेथील चोरट्यांचा या प्रकारात हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी केबलचे प्लास्टिकचे आवरण काढून आतील तांब्याची तार लंपास केली आहे. या चोरीत राजेंद्र घुमरे, सखाराम गुंड, राजाराम गुंजाळ, राजेंद्र कोळपकर, सुनील उगले, दौलत घुमरे, हरिभाऊ चौधरी, खंडू जाधव, धनराज कोळपकर, भाऊसाहेब गुंजाळ, सयाजी गुंजाळ, प्रशांत घोरपडे, शांतीलाल घोरपडे, नामदेव सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, प्रकाश घोरपडे, बाबाजी घोरपडे, केशव घोरपडे, माधव घोरपडे, बाळासाहेब पवार, नितीन गुंजाळ, केदू गुंजाळ, संजय गुंजाळ आणि निवृत्ती गुंजाळ या २४ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत व सोलर पंपांच्या केबल्स चोरीला गेल्या असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा आणि परिसरातील केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *