![]()
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ निफाडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने तीन तास धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. माजी आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, सचिन खडताळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव ढोमसे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष भूषण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आवाजाला लाठीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भावना व्यक्त करण्यात आली. रास्ता रोको सुरू असताना पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी खंडू बोडके पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार अनिल कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी विक्रम रंधवे, गौरव पानगव्हाणे, साहेबराव ढोमसे, मधुकर शेलार, सचिन खडताळे, भूषण शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
महाविकास आघाडीचा तीन तास एल्गार:विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ निफाडला रास्ता रोको