Headlines

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना:हिंगोलीतील 673 गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ६७३ गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी ता २४ जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही तालुक्यामधून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनस्तरावर अपलोड करण्यात आल्या होत्या. दरम्यान शासन स्तरावरून पात्र व अपात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली होती. शासनाने कर्जमुक्ती जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार शुक्रवारी ता 24 जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याद्यांची माहिती घेतली. शासनाकडून जाहीर झालेल्या ६७३ गावातील शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करून रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील १२१, कळमनुरी तालुक्यातील १४४, वसमत तालुक्यातील १३६, सेनगाव तालुक्यातील १३० तर हिंगोली तालुक्यातील १४२ गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हिंगोली तसेच सर्व ५ तालुक्यांचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी आणि सेनगाव यांच्या कार्यालयात ही यादी नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. परभणी च्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाखा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर देखील ही यादी प्रसिद्ध करून लाभार्थ्यांना कळवण्यात आली आहे. केवायसी करण्याचे आवाहन यादीतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड लिंक केलेले नसेल त्यांनी त्वरित आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *