Headlines

अवघा रंग एक झाला!:राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर




आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी जमली आहे. अनेक शहरे आणि गावांमध्ये पालखी तसेच दिंडीचे आयोजन करून विठूनामाचा जयघोष केला जात असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आणि चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, त्यांच्या विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे. तसेच चंद्रभागा तीर आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीनिमित्त ‘मुंबईचे प्रति पंढरपूर’ अशी ओळख असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पहाटे सहकुटुंब अभिषेक पूजा संपन्न झाली. यावेळी त्यांचे पती राजेश तावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईच्या महापौर या नात्याने विठुरायाची पूजा करण्याचा हा बहुमान मिळाल्याने आपले मन भरून आल्याची कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त करत, महापौर तावडे यांनी सर्व मुंबईकर आणि वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे भक्ती आणि कलेचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे, जिथे कुडाळचे डॉ. अनिकेत निब्रे यांनी आपल्या शेतात नदीतील दगड-गोटे आणि रानफुलांचा कल्पक वापर करून तब्बल 60 फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती साकारली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उभी राहिलेली ही आकर्षक कलाकृती पंचक्रोशीतील नागरिकांसाठी श्रद्धा आणि कौतुकाचा विषय ठरली असून, विठुरायाचे हे लोभस रूप डोळे भरून पाहण्यासाठी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *