![]()
“खिशात 50 ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या घटनेवेळी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन तरुणांपैकी एकाने पुढे येत या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणली असून, “ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त काळासाठी निलंबित करू नका,” अशी विनंती त्याने थेट मुंबई पोलिस प्रशासनाकडे केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला या तरुणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे विशेष आभार मानले असून, आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मध्यस्थी करत पोलिसांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सुखरूप सोडवून आणल्याबद्दल त्याने मनसेला मनापासून धन्यवाद दिले आहेत. राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत पोलिसांच्या गाडीतील त्या व्हायरल व्हिडीओचा संदर्भ देत पोलिसांच्या वर्तनावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना या तरुणाने सांगितले की, प्रत्येक गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट नसते. मी स्वतः त्या गाडीत उपस्थित होतो. सुरुवातीला जरी पोलिसांची भाषा किंवा परिस्थिती थोडी कडक वाटली, तरी नंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याने आमच्याशी अतिशय चांगला आणि मित्रत्वाचा व्यवहार केला. गाडीत उकाडा आणि उष्णता जाणवू लागल्याने आम्ही जेव्हा एसी लावायला सांगितला, तेव्हा त्यांनी लगेच एसी सुरू केला. एवढेच नाही तर प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून त्यांनी गाडीत गाणी ऐकण्याचे स्वातंत्र्य दिले आणि आम्ही सर्वांनी एकत्र गाणी ऐकली. तसेच पुढे या तरुणाने सांगितले की, त्या पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की, तुमचे आंदोलक मित्र तिथे अजूनही निदर्शन करत आहेत, तुम्ही जाऊन त्यांना जॉइन करा, असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्हाला सुरक्षितपणे आंदोलनाच्या ठिकाणी सोडले. पुढे व्हिडिओमध्ये त्या तरुणाने म्हटले की, त्या पोलिस अधिकाऱ्याला जास्त दिवसांसाठी निलंबित करू नका. लवकरच मुंबईत गणेशोत्सव सुरू होत आहे आणि या सणाच्या काळात शहरात प्रचंड गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलिस नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठी मदत करतात. त्यामुळे त्या पोलिसांवर जास्त मोठी कारवाई करू नये, अशी विनंती त्याने केली आहे.
Source link
'ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नाहीत':'खिशात पावडर' टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या बचावासाठी तरुण सरसावला