Headlines

लासलगाव-विंचूर मार्गावरील अर्धवट पुलाला कारची धडक:जीवितहानी टळली; वारंवार अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीती‎




लासलगाव-विंचूर पाच किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यावरील दोन ठिकाणी अर्धवट तोडून ठेवलेल्या पुलांपैकी एका पुलाला शुक्रवारी चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत असून, वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लासलगाव-विंचूर रस्त्यावरील दोन ठिकाणी पुलांचे काम सुरू असून, अर्धवट तोडलेल्या भिंती रस्त्याच्या मध्यभागीच आहेत. या ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स किंवा धोक्याचे इशारे फलक नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळ्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, भरधाव वाहने थेट पुलावर आदळत आहेत. शुक्रवारी झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. यापूर्वीही या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असतानाही आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. अर्धवट पुलांचे अवशेष तातडीने हटवावेत किंवा काम पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी परावर्तित दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स, फ्लॅश लाईट आणि धोक्याचे इशारे फलक लावावेत, अशी मागणी होत आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व संबंधित ठेकेदाराने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिक व वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री लासलगाव-विंचूर रस्त्यावर झालेला अपघात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *