Headlines

वैद्य पराग दाते यांना 'यशस्वी युवा वैद्य' पुरस्कार:ज्येष्ठ वैद्य धोपेश्वरकर म्हणाले, आयुर्वेदात निदानाचे महत्त्व सर्वाधिक




पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात रत्नागिरीचे आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना ‘यशस्वी युवा वैद्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नामांकित आयुर्वेद वाचस्पती वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी आयुर्वेदात निदानाच्या सर्वोच्च महत्त्वावर भर दिला. वैद्य धोपेश्वरकर म्हणाले की, रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे अचूक निदान, योग्य युक्ती आणि प्रभावी चिकित्सा या तिन्ही गोष्टींचा योग्य समन्वय साधणारा वैद्यच यशस्वी होतो. आयुर्वेदात ‘प्रश्न चिकित्से’द्वारे रुग्णांकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, जी निदानासाठी प्राथमिक आणि सोपी पद्धत आहे. प्रगतीशील वैद्य होण्यासाठी आयुर्वेदीय निदानाची कास धरणे आणि आयुर्वेदीय ग्रंथांना प्रमाण मानून वाटचाल करणे आवश्यक आहे. कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैद्य लावगनकर परिवार आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने या ‘यशस्वी युवा वैद्य पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयोजक वैद्य लक्ष्मण लावगनकर आणि वैद्य माधव भागवत उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी ‘आयुर्वेदीय निदानाचे महत्त्व’ या विषयावर विस्तृत व्याख्यान दिले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैद्य पराग दाते यांनी सांगितले की, आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासाकडे आपली प्रवृत्ती ठेवून आणि अनुभवातून शिकल्यास वैद्यांना चांगले यश मिळू शकते. सर्वप्रथम व्याधीचे अचूक निदान करता आले, तर पुस्तकात दिलेल्या विविध चिकित्सा पद्धतींचा वापर करणे सोपे होते. त्यामुळे सुरुवातीला निदान अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्य लक्ष्मण लावगनकर यांनी कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांच्या कार्याची माहिती दिली. नाना लावगनकर यांची धारणा होती की, आयुर्वेद जितका सोपा करता येईल, तितका तो समाजात खोलवर रुजविता येईल. त्यांनी आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी आपले आयुष्य वेचले आणि वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला. स्वतः आयुर्वेदाची दिनचर्या पाळून त्यांनी उत्तमोत्तम वैद्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीने या युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *