Headlines

दुसऱ्या विवाहासाठी 2 वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलले:सोलापुरात पत्नीसह सासरच्या 5 जणांवर फौजदारी तक्रार




दुसऱ्या विवाहात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन वर्षांच्या निष्पाप मुलाला छतावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने, अखेर मुलाचे वडील विक्रम कामूर्ती यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, पत्नीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम कामूर्ती आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून वैवाहिक वाद सुरू असून, हे प्रकरण सध्या कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, पत्नीला दुसरा विवाह करायचा आहे. परंतु, या नव्या नात्यात आपला दोन वर्षांचा मुलगा अडसर ठरत असल्याची तिची समजूत होती. याच कारणातून तिने कुटुंबातील इतर सदस्यांशी संगनमत करून या चिमुकल्याला अत्यंत निर्दयीपणे छतावरून खाली ढकलून दिले. या भयंकर घटनेत बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. या घटनेनंतर हादरलेल्या कामूर्ती यांनी तातडीने स्थानिक पोलिसांकडे धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडे केवळ ‘कौटुंबिक वाद’ असल्याचे सांगत कोणतीही कारवाई न करता दुर्लक्ष केले. पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने कामूर्ती यांनी सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. पी. पाटील यांच्या न्यायालयात पत्नी आणि सासरच्या इतर चार जणांविरुद्ध खासगी फौजदारी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध नवीन ‘भारतीय न्याय संहिता’च्या कलम 109 आणि कलम 61(2) अन्वये कारवाई करून त्यांना समन्स बजावण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. तसेच, गंभीर जखमी असलेल्या बालकाच्या वैद्यकीय उपचारांसाठी 5 लाख रुपयांची भरपाई मिळावी आणि जिवाला धोका असल्याने तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी, 29 जुलै रोजी होणार असून, न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *