![]()
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. नुकताच मंगळवेढ्यातील माऊली मंदिरामध्ये “सिवाजी” नावाचा दुर्मिळ शिलालेख आढळून आल्याने या इतिहासाला न
.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानंतर मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाहीची राजधानी विजापूर जिंकण्यासाठी संयुक्त मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती नेताजी पालकर आणि मोगल सैन्य सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान १९ डिसेंबर १६६५ रोजी सेनापती नेताजी पालकर यांनी मंगळवेढ्याचा भुईकोट किल्ला जिंकला. त्यानंतर २० डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंह यांनी या किल्ल्याला भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद उपलब्ध आहे. विजापूरवरील मोहीम अपेक्षित यशस्वी न ठरल्याने महाराज पुन्हा मंगळवेढा येथे परतले. त्यानंतर २४ डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढा परिसरात मोगल आणि आदिलशाही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. आदिलशाहीच्या बाजूने सर्जाखान, खवासखान, कल्याण यादव, याकुतखान तसेच शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे सहभागी होते. शहाजीराजांच्या निधनानंतर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे हे परस्परविरोधी बाजूंनी युद्धभूमीवर आमनेसामने आले होते. इतिहास अभ्यासक व लेखक रवी मोरे यांनी या शिलालेखाचा शोध लावला आहे.
‘सिवाजी’ शिलालेखामुळे संशोधनाला नवी दिशा मंगळवेढ्यातील मोहनी बुवा उर्फ मौनी बुवा मंदिरात आढळून आलेल्या “सिवाजी” या नावाच्या शिलालेखामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंगळवेढा भेटीशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांना अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेले शिलालेख अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने हा शोध इतिहास संशोधनासाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.