![]()
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे. प्रवीण वाळिंबे संपादित ‘देशो देशी पानो पाणी आशा आशा’ या विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. आशा भोसले अत्यंत जिद्दी आणि कामसू होत्या, त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड दिले, असेही उषा मंगेशकर यांनी नमूद केले. हा विशेषांक आशा भोसले यांच्या जीवन आणि कारकिर्दीवर आधारित आहे. शनिवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उषा मंगेशकर यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पुणे मनपा काँग्रेसचे गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आणि नगरसेवक सुनील शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उषा मंगेशकर यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कोलकात्यातील एका मैफिलीला तब्बल १ लाख ३० हजार रसिकांनी तिकीट काढून उपस्थिती लावली होती, असे त्यांनी सांगितले. पुढील २०० वर्षांत लता आणि आशा यांच्यासारख्या गायिका होणे कठीण आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. लता दीदींनी ३५ भाषांमध्ये गाणी गायली, तर आशाताईंनीही आपल्या बहुआयामी गायकीने वेगळे स्थान निर्माण केले. आशाताई आजही त्यांच्या गीतांमधून अजरामर आहेत, म्हणूनच आम्ही त्यांच्या छायाचित्राला कधी हार घालत नाही, असे उषा मंगेशकर म्हणाल्या. चार मुलांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी स्वतःचे दुःख कधी मुलांपर्यंत पोहोचू दिले नाही, असेही त्यांनी सांगितले. आशा भोसले यांना साड्यांची आणि खरेदीची विशेष आवड होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला. मंगेशकर घराण्यातील गायनाची परंपरा अखंड सुरू राहावी, यासाठी मी आजही गात आहे, असेही त्यांनी सांगितले. आशाताईंनी हजारो गाणी गायली असली तरी, ‘पांडूरंग कांती दिव्य तेज झळकती’ हे आशाताईंनी गायलेले गाणे मला खूप आवडते, असे उषा मंगेशकर यांनी सांगितले. माजी आमदार उल्हास पवार यांनी या विशेषांकाचे कौतुक केले. आशा भोसले यांच्यावरील विविध भाषांतील लेख, छायाचित्रे आणि निधनानंतर जगभरातील वृत्तपत्रांतील ठळक बातम्यांचे संकलन करणे हे अत्यंत अवघड काम होते. हा विशेषांक संग्रही ठेवावा असा दस्तावेज ठरेल, असे पवार म्हणाले.
Source link
आशा भोसले यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात:विशेषांकाच्या प्रकाशनावेळी उषा मंगेशकर भावुक