![]()
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शासकीय परिचारिका संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात निदर्शने केली. सकाळी अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात परिचारिकांनी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निदर्शनांदरम्यान प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिचारिकांना वाहन पार्किंगसाठी येणाऱ्या अडचणी आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा प्रलंबित भत्ता या प्रमुख मागण्या होत्या. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास लवकरच एक दिवसाचे ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले. परिचारिका संघटनेची मुख्य मागणी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा प्रोत्साहनपर भत्ता त्वरित देण्याची आहे. यापूर्वीही याबाबत चर्चा झाली होती, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. रुग्णालयात परिचारिकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सध्या महिला परिचारिकांना गाड्या इतरत्र लावाव्या लागत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, लिपिक विभागाकडे असलेली परिचारिकांची प्रलंबित कामे आणि त्यात होणारा विलंब थांबवण्यात यावा, अशी मागणीही संघटनेने केली. या निदर्शनांच्या वेळी शासकीय परिचारिका संघटनेचे अध्यक्ष शुभमंगल भक्त, सचिव इंदुमती थोरात, प्रवीण व्यवहारे, प्रतिभा अंधारे, मकरंद उदयकार, लता सोंडगे, मुजम्मिल पठाण, अनुजा टेकाळे, गणेश गावडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. याबाबत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, परिचारिका संघटनेच्या कार्यालय परिसरात मेट्रन ऑफिससमोर वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, जनआरोग्य योजनेच्या भत्त्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Source link
घाटी रुग्णालयात परिचारिकांचे निदर्शन:प्रलंबित मागण्यांसाठी 'काम बंद' आंदोलनाचा इशारा