![]()
राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गतणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासह विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ‘दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक (अराजपत्रित गट-ब)’ या संवर्गातील तब्बल 160 अधिकाऱ्यांना ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-2 / सह दुय्यम निबंधक, वर्ग-2 / मुद्रांक उपअधिक्षक’ या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरुन आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या वतीने आज (दि. 27 जुलै ) रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर 160 अधिकाऱ्यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-2 या पदावर पदोन्नती देण्याची ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे. विभागनिहाय पदोन्नतीचा तपशील
राज्यभरातील विविध विभागांनुसार पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. कोकण विभाग : 59 अधिकारी
पुणे विभाग : 42 अधिकारी
नागपूर विभाग : 19 अधिकारी
छत्रपती संभाजीनगर विभाग : 15 अधिकारी
नाशिक विभाग : 14 अधिकारी
अमरावती विभाग : 11 अधिकारी
एकूण : 160 अधिकारी नागरिकांना सेवा मिळणे होणार अधिक सुलभ नोंदणी व मुद्रांक विभाग हा दस्त नोंदणीची सेवा देण्यासोबतच मुद्रांक अधिनियमाची अंमलबजावणी करून राज्याच्या महसूल संकलनात महत्त्वाची भूमिका बजावतो. सर्वसामान्य नागरिकांचा विविध खरेदी-विक्री व करारांच्या दस्त नोंदणीसाठी या विभागाशी दैनंदिन थेट संबंध येत असतो. या पदोन्नतीमुळे कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरली जाऊन दस्त नोंदणीचे कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, या पदोन्नतीमुळे ‘दुय्यम निबंधक श्रेणी-1/ मुद्रांक निरीक्षक’ या संवर्गात रिक्त झालेल्या जागासुद्धा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्यामार्फत पदोन्नतीने तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे नोंदणी विभागाची संपूर्ण प्रशासकीय साखळी अधिक सक्षम होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना दस्त नोंदणीच्या सेवा जलद, पारदर्शक आणि विनाअडथळा मिळाव्यात, यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे. विभागात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावत आज एकाच वेळी 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल आणि दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचून त्यांना मोठा दिलासा मिळेल. रिक्त झालेली उर्वरित पदेही तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
Source link
राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागात बढत्या:तब्बल 160 अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती, महसूलमंत्री बावनकुळेंचा पुढाकार