![]()
अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करून बदनामी केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (१९) याच्या घरावर आज, बुधवारी पालिकेने बुलडोजर चालवला. सदर घराचा जीना हा अतिक्रमणमध्ये असल्याने पोलिस संरक्षणात तो जमीनदोस्त करण्यात आला. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपीबद्दल अचलपुरसह जिल्हाभरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी तेथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीतच बुधवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. गुजरी बाजार, सदरबाजार, नवाब मार्केट, सिव्हील लाईन, बसस्थानक परिसर, मिश्रा लाईन, टिळक चौक आदी प्रमुख भागांतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. बंदमध्ये विविध सामाजिक संघटना, व्यापारी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांनी एकत्र येत आरोपींचा तीव्र निषेध नोंदवला. “अशा विकृत प्रवृत्तीला थारा नाही”, “पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणीही यावेळी करण्यात आली. आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांआधीच दिली होती नोटीस बंददरम्यान नगरपालिकेसमोर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. तोडकामाची कारवाई तत्काळ केली जावी, असे हा जमाव म्हणत होता. मात्र पोलिस आणि पालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन अयान हा ज्या घरी भाड्याने रहात होता, त्या जाकीरा फरीन निसार अली या घरमालकीनला दोन दिवसाआधीच अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने आज घराला लागून असलेली लोखंडी शिडी बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आली. आगामी ३० दिवसांत उर्वरित अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी सांगितले आहे.
Source link
अचलपूर प्रकरण:आरोपीच्या घरावर चालवला बुलडोजर, नागरिकांचा अचलपुरात कडकडीत बंद, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी