राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात कर्जमाफीच्या याद
.
पासबुक दाखवून मांडली आपबिती; ८० टक्के याद्यांमध्ये तफावत
गंधोरा गावातील २३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीत पात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेत मोठा घोळ असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी थेट बँकेचे पासबुक माध्यमांसमोर पुरावा म्हणून दाखवत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
१.५४ लाखांच्या कर्जावर अवघी ९४ हजारांची माफी
गंधोरा येथील शेतकरी जीवन विष्णू पाटील यांच्यावर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे १ लाख ५४ हजार ७३८ रुपये कर्ज थकीत आहे. दोन लाखांच्या आतील कर्ज असल्याने पूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित होते; परंतु, सरकारच्या यादीत त्यांना अवघ्या ९४ हजार ४२७ रुपयांचाच लाभ मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, “उरलेले ६० हजार रुपये जमा केल्याशिवाय या ९४ हजारांची कर्जमाफी लागू होणार नाही,” असे उत्तर बँक अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यंदा पेरणी नाही, शिक्षणाचाही खर्च; पैसे भरणार कुठून?
पावसाच्या लहरीपणामुळे यंदा पेरणी झालेली नाही, त्यातच मुलांच्या शिक्षण आणि दैनंदिन खर्चाचा डोंगर समोर उभा आहे. अशा बिकट परिस्थितीत बँकेत ६० हजार रुपये भरायचे कुठून? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. योजनेची योग्य दुरुस्ती करून सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी शेतकरी आता बँकेच्या फेऱ्या मारत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यालाही कमी कर्जमाफी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकऱ्यांना कमी कर्जमाफी मिळाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. चिकलठाण गावातील शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांचे कर्ज २,०६,६०२ एवढे असताना सरकारच्या कर्जमुक्तीच्या यादीत १,२०,५६१ एवढीच रक्कम दाखवण्यात आली. उरलेली रक्कम कोण भरणार याचे उत्तर सरकार देणार का? अशी विचारणा अंबादास दानवे यांनी केली आहे. यातील रक्कम बँकांनी भरायची असल्याचे सांगून सरकारने धूळफेक करू नये. कर्जमुक्तीच्या क्रेडिट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचेही उत्तर द्यावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.



दोन लाखांखालील कर्जासाठी पैसे भरण्याची गरज नाही – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. “ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना एकही रुपया भरण्याची गरज नाही. बँकांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांवर पैसे भरण्यासाठी दबाव आणता कामा नये. जर एखाद्या शेतकऱ्याची कर्जमाफीची रक्कम कमी दिसत असेल, तर त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असू शकतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही,” असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
हे ही वाचा…
कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच:16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. सविस्तर वाचा…