![]()
अमरावती येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने बुधवारी, १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. डॉ. तोगडिया यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी अमरावतीत माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया यांनी एका महिला पत्रकाराला “आप मुस्लीम हो क्या, मंदिरविरोधी हो क्या?” अशी विचारणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पत्रकार अवाक् झाले होते आणि त्यांनी त्याचवेळी या वर्तनावर आक्षेप घेतला होता. माध्यम संवादाचे आयोजक लप्पीसेठ जाजोदिया यांनीही पत्रकारांसमोर खेद व्यक्त केला होता. डॉ. तोगडिया यांचे हे वर्तन अयोग्य असल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी “सावित्रीबाई फुले के देश मे महिला पत्रकारों का अपमान नही चलेगा”, “प्रवीण तोगडिया मुर्दाबाद”, “प्रवीण तोगडिया हाय हाय”, “जातीयवादी प्रवीण तोगडियावर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या. निवेदनात डॉ. तोगडिया यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आणि महिला पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, जिल्हा संघटक विनोद इंगळे, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील घटाळे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष गुडधे, योगिनी अर्डक, महिला अध्यक्ष अर्चना रक्षे, जया मेहरा, योगेश मोहोकार, प्रशांत सुने, विशाल तायडे, अमोल खडसे, बंडूकुमार धवणे, सुरेश तायडे, समीर अहमद, सिद्धार्थ दामोदरे, आदेश मेटांगे, मोरेश्वर पवार, अमोल तायडे, निलेश आहेर, अरविंद नगराळे, छत्रपती बांबोडे, तुळशीदास मेश्राम, विनोद मुळे पाटील, धनराज खर्चान, अजय शृंगारे, गजानन खोपे, विक्रम ढोके, उज्वल भालेकर यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकार सहभागी झाले होते.
Source link
तोगडियांविरोधात अमरावतीत तीव्र निदर्शने:महिला पत्रकाराबाबतच्या वक्तव्यावरून पत्रकार संघाचे आंदोलन