Headlines

पुण्यात 8 ऑगस्टला आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा:अनुसूचित जातींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजन, जातनिहाय जनगणना करण्याचीही मागणी




अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा नियोजन समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता मंगळवार पेठेतील जुना बाजार चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये अ, ब, क आणि ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, शासकीय सेवांमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली अनुशेष पदे विशेष भरती मोहीम राबवून तत्काळ भरावीत, तसेच पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. देशभरात जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही आयोजकांनी केली आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. आयोजक यशवंत नडगम म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही एका जातीचा किंवा विशिष्ट घटकाचा नसून संविधानप्रेमी समाजाच्या हक्कांसाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. आंबेडकरी, बहुजन आणि संविधाननिष्ठ नागरिकांनी शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होऊन महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही आंदोलन कर्त्याना करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *