![]()
पुण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तौफीक शेख, समीर शिंदे आणि राजन दोरास्वामी (तिघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सयान निजामुद्दीन शेख (वय १८, रा. वैदुवाडी, इंदिरानगर, हडपसर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (१४ एप्रिल) विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरव आणि त्याचे मित्र रवी कोळी, शाहरुक शेख, रेहान हे दुचाकीवरून विश्रांतवाडी भागात आले होते. त्यांनी येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात दुचाकी लावली होती. आरोपींशी गौरवचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी गौरवचा खून करण्याचा कट रचला होता. विश्रांतवाडीतील कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौरव आणि त्याचे मित्र पंचशीलनगर परिसरात लावलेली दुचाकी घेण्यासाठी निघाले होते. आरोपी गौरवच्या मागावर होते. येरवड्यातील कॉमर झोन आयटी कंपनीजवळील रस्त्यावर आरोपींनी गौरवला गाठले. त्यांनी गौरववर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना धमकावले. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संपतराव राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून:आधी गोळीबार, मग कोयत्याने वार करून संपवले; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल