Headlines

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल




महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे मंत्री अदिती तटकरे यांना उद्देशून म्हणाल्या, महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणे आणि ‘किती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार’ एवढे करणे थांबवा. मुळात तुम्ही महिला बाल कल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीण बाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केला आहे? की आम्ही असे समजायचे का, की तुम्हाला मंत्री करणाऱ्या अजितदादांचीच काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय कारवाई करणार? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. अदिती तटकरेंना सुनावले खडेबोल पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही आणि दादांच्या बद्दल एफआयआर व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही. तर इथे तुम्ही रूपाली चाकणकरला अटक करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभेतून आणि ‘सो कॉल्ड’ तुमच्या बिझी शेड्यूलमधून बोला न त्यावर. की चाकणकरच्या कोणत्या फार्महाऊसवर बुलडोझर चालवला जाणार आहे? चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्र व्यवहार केला आहे? कारण तुमची ही जबाबदारी आहे महिला नेत्या म्हणून. नाहीतर भविष्यात तुम्ही हे म्हणून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की मी यांना महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पद घ्यायची आणि मागायची याची अपेक्षा करू नका, असे खडे बोल अंधारे याणणू अदिती तटकरे यांना सुनावले आहेत. रूपाली चाकणकर वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे का? सुषमा अंधारे म्हणाल्या, तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसांपासून सांगत आहोत की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती. आता तर चाकणकरचे संबंध अधिक अधिक स्पष्ट झाले आहेत. पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही नाही आमच्या सह्या तर बनावटच आहेत. आपले तिथे काही नाही, आपल्याला बोलावले होते, हे आपल्याला आपल्याला म्हणजे काय? आपल्याला आपल्याला ही कोणती भाषा वापरत आहात तुम्ही? प्रतिभा चाकणकर त्यांच्या खात्यांमध्ये माझी बनावट कागदपत्र वापरली आहेत असे म्हणत असतील तर केवायसी करताना ओटीपी कोणाच्या मोबाइल नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहीत नव्हते तर मग त्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे का? कारण प्रतिभा चाकणकरपेक्षा जास्त संबंध रुपाली चाकणकरांची आहे. पण त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? त्यांना पुढे करून तसेच त्यांच्या 14 वर्षांच्या लेकराला पुढे करून रूपाली चाकणकर वाचण्याचा प्रयत्न करत आहेत का? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले. नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? सुषमा अंधारे म्हणाल्या, अशा वेळेला एका 14 वर्षांच्या लेकराची सुद्धा मीडिया ट्रायल होते, तेव्हा बालकल्याण मंत्री असणाऱ्या अदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमच्या आयोगाचे फार हात शिवशिवतात, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेतील खाती बनावट आहेत असे जर म्हणायचे असेल तर मग समता पतसंस्थेतील संचालक मंडळ बनावट आहे का? मग यात पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांसमोर बाइट दिली होती की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असेच तर कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असे म्हणू की नाही नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी या दोघींची नावे माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावे चर्चेत आली, अगदी त्याच क्षणी या दोघी पोलिसांना भेटायला का गेल्या नाहीत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथी आडून तीर मारत आहेत, दर तीन दिवसांनी ग्राफिक्स बनवून बाइट पाठवत आहेत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच जो न्याय अमरावतीमध्ये बुलडोझर लावण्याचा आहे, तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. एक महिन्यापासून तुम्ही आम्हाला खरातचा फार्म हाऊस दाखवत आहात, पण त्यावर बुलडोझर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेचा आहे की ठाणेकरांचे आहे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. फडणवीस साहेब तुम्ही केसरकरांना वाचवत आहात का? ठाणेकरांचे पुन्हा पुन्हा कनेक्शन पुढे येत आहे. त्यात केसरकरची अजूनही चौकशी झाली नाही. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कोणाला वेड्यात काढत आहात? कोण कोणाला वेड्यात काढत आहे ते आम्हाला एकदा कळू द्या. काय चाकणकरांना हा संदेश द्यायचा आहे का की मी कोणालाच जुमानत नाही, तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही. हे सांगायचे आहे का चाकणकरला? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? दीपक केसरकर आणि दीपक लोंढेचे संबंध सतत सतत समोर येत आहेत, सतत नव्या नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावले जात नाही. फडणवीस साहेब तुम्ही केसरकरांना वाचवत आहात का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? एकनाथ शिंदेंची चौकशी करण्याची हिम्मत गृह खात्यात आहे का? पुढे बोलताना सुषमा अंधारे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाल्या, तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचे चालू असेल तर त्या बिलमध्ये आधी महिलांना सुरक्षा द्या. आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचे नंतर बघू. आणि महिलांना संरक्षण द्यायचे असेल तर हे केसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा संबंध दाखवला गेला, त्यांचे कॉल दाखवले गेल. एकनाथ शिंदे यांची चौकशी करण्याची हिम्मत गृह खात्याची आहे का? खरंच महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत का? महाराष्ट्रातल्या एकूण अशा पद्धतीच्या लिंगपिसाट, भोंदू, भुभुक्षित आणि वखवखलेल्या नजरांनी महाराष्ट्रातल्या लेकी बाळींकडे बघणाऱ्या लोकांना कोणीही वाचवू शकणार नाही, कुठलीही राजकीय शक्ती वाचवू शकणार नाही, हा संदेश जर फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचा असेल तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *