Headlines

मेळघाटातील पाणी, शिक्षण, सावकारी पाश सोडवणुकीसाठी आयुक्तांना साकडे:मेळघाटातील अनेक विषयांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश‎




मेळघाटमधील चिखलदरा, धारणी या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांच्या मूलभूत समस्यांसह विविध ४० महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात एका शिष्टमंडळाने येथील विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जलजीवन मिशनमधील घोटाळ्यांपासून ते शाळा, वीज, आरोग्य, खतांचा काळाबाजार आणि सावकारी पाशापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर विभागीय चर्चा झाली. आयुक्तांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना व कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना शासकीय दरापेक्षा जास्त भावाने युरिया खताची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणीही या वेळी केली. चर्चेदरम्यान पिंपळखुटा येथील शासकीय निवासी आश्रम शाळेत इयत्ता १ ते १२ वीच्या एकूण ५३३ विद्यार्थ्यांपैकी १० वी व १२ वीचे १४५ विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ही माहिती ऐकताच आयुक्त सिंघल यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करुन त्यांना खडसावले. संबंधित विभाग प्रमुखाशी बोलणी करुन दोन दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल मागवला. मेळघाटातील नागरिकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी ३,००० कोटी वृक्षारोपणाचे कार्य सामाजिक वनीकरण विभागामार्फत केले जावे, मेळघाटातील पशुवैद्यकीय दवाखाने बंद राहत असल्यामुळे पाहणी करुन उपाययोजनेची मागणी केली. वीज नसलेल्या गावांची व नागरिकांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले गेले. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी भरारी पथकांच्या गाड्या वाढवण्याबाबत चर्चा केली. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, बीएसएनएल, महावितरण, सौर उर्जा आदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही संबंधितांनी भेटी घेतल्या.दरम्यान चिखलदरा येथील एकताई ग्रामपंचायत क्षेत्रातील बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम वेगाने पूर्ण करून नेटवर्क सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत मेळघाटातील ४० गावांना लाभ दिला जाणार असल्याचे महाराष्ट्र ऊर्जा विभागाचे अधिकारी हिंगे यांनी स्पष्ट केले.यावेळी ॲड. बंड्याभाऊ साने, रामबाबू दहिकर, विठ्ठल हेकडे, उषाताई बेलसरे, अविनाश बेलसरे, वासुदेव बेलसरे, तोताराम भाऊ, सोनाजी भाऊ, रामदासभाऊ भिलावेकर, ॲड. दशरथभाऊ बावनकर, हरीश येवले, दीपक मसराम, रामदास हिवराळे, सोनू भुसारे, सुमित्रा अहाके, अनिल मावस्कर, जयकिसन कास्देकर, करण दारसिंबे, लक्ष्मण बेलसरे, सरिता बेलसरे, रेणुका जामकर, उषा जामकर, अंकिता मावसकर, कृष्णा मावस्कर उपस्थित होते. १ ऑगस्टला सावकारीबाबत बैठक सावकारांकडून जाचक व्याजाची होणारी वसुली रोखण्यासाठी १ ऑगस्टला परतवाडा (अचलपूर) येथील सहायक निबंधक कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मेळघाटसह अचलपुर तालुक्यातील सर्व सावकार व अधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. मेळघाटमध्ये अव्वाच्या सव्वा व्याज घेतले जाते, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी हे निर्देश दिले आहे. चिखलदरा तालुक्यातील सुमिता गावात नळाचा केवळ बनाव चिखलदरा तालुक्यातील ‘सुमिता’गावात जलजीवन मिशनअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचे चर्चेदरम्यान स्पष्ट झाले. मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार (पीएलआय ११३/२००७) सुमिता गावातील ७६ घरांमध्ये नळ बसवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पाणी पोहोचलेलेच नाही. संबंधित विभागाने प्रपत्रात पाण्याची सोय केल्याचा बनाव केला होता. यावर उपाययोजना करून तातडीने योग्य पाणीपुरवठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *