![]()
पुणे शहरात खंडणीविरोधी पथक क्रमांक एकने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेली चार गावठी पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी २३ वर्षीय भूषण उत्तम मोहिते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे शहरातील गोकुळनगर-नऱ्हे परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची एकूण किंमत दोन लाख ६०० रुपये आहे. अटक करण्यात आलेला आरोपी भूषण उत्तम मोहिते हा धायरी-पोकळे वस्ती, पुणे येथील ओम साई ऑर्किड येथे राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आणि फरारी आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असताना, पोलिस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे आणि दयानंद तेलंगे यांना गोकुळनगर-नऱ्हे परिसरात एक व्यक्ती पिस्तुले विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचला आणि भूषण मोहिते याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार गावठी पिस्तुले, मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. प्राथमिक चौकशीत, ही पिस्तुले गुजरवाडी येथील महेश कांबळे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे मोहितेने पोलिसांना सांगितले आहे. आरोपींनी आतापर्यंत कोठे कोठे शस्त्र विक्री केली आहे याबाबतची माहिती देखील पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Source link
पुण्यात चार गावठी पिस्तुले जप्त:विक्रीसाठी आणलेल्या शस्त्रांसह 23 वर्षीय तरुण अटकेत