खरीप पीक विमा 2025च्या भरपाईत झालेली प्रचंड तफावत आणि मतदारसंघातील महसूल मंडळे विम्यातून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी थेट वाशीच्या तहसीलदारांना फोन करून चांगलेच फैलावर घ
.
तानाजी सावंत तहसीलदारांवर का संतापले?
शेजारच्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत पीक विमा मंजूर झाला असताना, भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील अनेक महसुली मंडळांमध्ये केवळ 900 ते 3,500 रुपयांपर्यंतच भरपाई जाहीर झाली आहे. या भीषण तफावतीवरून सावंत आक्रमक झाले.
फोनवर तहसीलदारांनी ‘बघून घेतो सर’ असे उत्तर देताच सावंत संतापले. ते म्हणाले, “अहो, बघून घेतो म्हणजे काय? आमच्याकडच्या शेतकऱ्यांना 700, 900 रुपये आणि शेजारच्या भागाला काही हजार मिळतात, हे कसं काय? इतकी तफावत कशी काय? लोक आत्महत्या करतील, आंदोलनं सुरू होतील. लोकांचे संसार जळायला लागलेत आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं नाही का?”
विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्वरित चर्चा करून या तफावतीचा जाब विचारावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे कडक निर्देश सावंत यांनी दिले आहेत.
मतदारसंघातील 7 महसूल मंडळे विम्यातून वगळली; सावंत सोशल मीडियावर ट्रोल
भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील तब्बल 7 महसूल मंडळे पीक विमा भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. अतिवृष्टीच्या वेळी ज्या भागाची आमदार तानाजी सावंत यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली होती, त्याच महसूल मंडळांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावरून सोशल मीडियावर सावंत यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
पीक कापणी प्रयोगावेळी लक्ष का दिले नाही?
आमदारांनी तहसीलदारांना फोन केला असला, तरी ‘पीक कापणी प्रयोगाच्या वेळी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष का दिले नाही?’ असा थेट सवाल शेतकरी विचारत असून, हा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ
दरम्यान, राज्यातील पीक विम्याच्या आकडेवारीतून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात तब्बल 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाही. सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून, केवळ छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास ७ लाख शेतकरी कमी झाले आहेत.
विमा न भरण्याचे कारण
यंदापासून पीक विमा योजनेतील ‘पाच जोखीम ट्रिगर’ वगळण्यात आल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. धोरणातील या बदलांमुळे आणि भरपाईत होणाऱ्या अन्यायामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास उडाला असून, त्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…
2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार

अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी