Headlines

विशाल घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा




बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास घुले यांच्या आई आशाबाई घुले याही उपस्थित होत्या. विलास घुले हे हॉटेल व्यावसायिक होते. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी ते गेले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, तपासाच्या दिशेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. विशाल घुलेंच्या आईचे खासदारांच्या मुलावर गंभीर आरोप पत्रकार परिषदेत बोलताना आशाबाई घुले यांनी अत्यंत गंभीर आरोप करत खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांचा या कटात सहभाग असल्याचा दावा केला. मृत्यूपूर्वी विलास घुले यांनी दिलेली माहिती आणि चार साक्षीदारांच्या जबाबांतून हे नाव समोर आल्याचा दावा त्यांनी केला. तक्रारीतून काहींची नावे काढून टाकण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असून रात्री घरी येऊन धमकावले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. “आम्हाला न्याय मिळाला नाही तर रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करू,” असा इशाराही त्यांनी दिला. ‘माझा मुलगा राजकारणात नव्हता’ भावनिक होत आशाबाई घुले म्हणाल्या, “माझ्या पोटचा गोळा गेला. तो कोणत्याही राजकारणात नव्हता. स्वतःचे काम करून कुटुंबाचा सांभाळ करणारा मुलगा होता. त्याच्याशिवाय आम्ही कसे जगायचे? आमच्या पाठीशी कोणीही नाही. आम्हाला फक्त न्याय हवा आहे.” आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते धाव घेतात, विशेष सरकारी वकील दिला जातो. मात्र, वंजारी समाजातील युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच संवेदनशीलतेने कोणी पुढे येत नाही. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सीबीआय चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा घुले हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करत सदावर्ते यांनी बीड पोलीस प्रशासनाला इशारा दिला. तपासात हलगर्जीपणा झाल्यास राज्यभरातील वंजारी आणि ओबीसी समाज बीडमध्ये एकत्र येऊन तीव्र आंदोलन आणि उपोषण करेल, असा इशारा त्यांनी दिला. घुले कुटुंबाला आवश्यक असल्यास आपण आणि डॉ. जयश्री पाटील मोफत कायदेशीर मदत देण्यास तसेच सरकारी वकील म्हणून काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. एफडीएच्या कारवाईचे समर्थन मुंबई उच्च न्यायालयाने पंचतारांकित हॉटेलांवरील एफडीएच्या कारवाईबाबत व्यक्त केलेल्या निरीक्षणांवरही सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. अन्न सुरक्षा अधिकारी तुकाराम मुंडे आणि एफडीएने कायद्यानुसारच कारवाई केली असल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये अपील किंवा पुनर्विलोकनाची तरतूद असताना पंचतारांकित हॉटेले थेट उच्च न्यायालयात जातात, असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “पाचतारांकित हॉटेल असो किंवा वडापाव विक्रेता, अन्न सुरक्षा कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे,” असे ते म्हणाले. ‘स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड नको’ हॉटेल आणि खाद्य व्यवसायात स्वच्छतेचे निकष अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत सदावर्ते म्हणाले की, विदेशी पर्यटक आजारी पडल्यास देशाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे न्यायालयाने अशा आस्थापनांना अधिक जबाबदारीने वागण्याचे निर्देश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी आंदोलक युवकांबाबत केलेल्या वक्तव्याचाही सदावर्ते यांनी निषेध केला. “मी भाजपचा मतदार आहे, मात्र खासदार हे संविधानाचे सेवक असतात. कोणत्याही नागरिकाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असे ते म्हणाले. कंगना राणावत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे देशातील तरुणांचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने माफी मागण्याची मागणी केली. अशा वक्तव्यांचा भाजपच्या प्रतिमेवरही परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे पाटलांवर उपरोधिक टीका मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित उपोषणावर भाष्य करत सदावर्ते यांनी पुन्हा उपरोधिक टीका केली. निजामकालीन किंवा हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिली जाणारी जात प्रमाणपत्रे कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, “जरांगे आले की पुन्हा चर्चेला जाता यावे म्हणून उपसमितीतील मंत्र्यांनी गुलाल लागलेले शर्ट धुवूच नयेत,” असा टोला लगावत त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरही टीका केली. हे ही वाचा… 2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *