![]()
प्रेमदान चौकातील वेदांतनगर येथील प.पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली. भारतासह अमेरिकेतून आलेल्या गुरूबंधू-भगिनींनी श्रीदत्तक्षेत्रातील सद्गुरू अधिष्ठान मंडपात गुरूचरणी लीन होत गुरुपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेतला. उत्सवाच्या पूर्वसंध्येला देवस्थानातील श्री महालक्ष्मी मंडपात कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांच्या हस्ते पाठशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन वस्त्रांची भेट देण्यात आली. श्रीदत्तक्षेत्रातील श्रीदत्तात्रेय निवास, भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर, गुरुदेवांचे अधिष्ठान तसेच तपोवन रोडवरील स्मृतीमंदिर विविध फुलांनी सजविण्यात आले होते. केळीचे खुंट, तोरणे व आकर्षक रांगोळ्यांनी परिसराचे सौंदर्य खुलले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे श्रीदत्तात्रेय निवास येथे महापूजेनंतर परंपरेनुसार व्यासपूजन झाले. श्रीनृसिंह सरस्वती तपोवन येथील स्मृतीमंदिरात गुरुपादुकांवर तसेच भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराच्या गर्भगृहात लघुविष्णू अभिषेक करण्यात आला. सकाळी व्यासपूजा व वेदांत विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अध्यापकांचे गुरुपूजन झाले. दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाद्यपूजेनंतर गुरुदेवांच्या दृकश्राव्य आशीर्वादाचा लाभ भाविकांनी घेतला. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. भाविकांनी विविध ठिकाणी शिस्तबद्ध रांगा लावून दर्शन घेतले. देवस्थानचे कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर, उत्सव समितीचे अध्यक्ष आर. जे. जाधव, समिती सदस्य, सत्संग मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
Source link
शहरात श्रीदत्त देवस्थानमध्ये गुरूपौर्णिमेस भाविकांची गर्दी:अमेरिका ते भारतातील गुरूबंधू-भगिनींचा सहभाग