![]()
अकोले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. भाजप नेते तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगरसेविका वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा विजय एकतर्फी होईल, असा दावा केला आहे. मात्र, बंडखोर उमेदवार सोनाली नाईकवाडी यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार देत आपण निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचे सांगितल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. गुरुवारी अकोलेतील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी पक्षातील नगरसेवकांमध्ये फूट नसल्याचा दावा केला. सहलीवर गेलेले नगरसेवक ३१ जुलै रोजी सकाळी अकोल्यात परततील आणि नगरपंचायत सभागृहात उपस्थित राहून भाजपच्या अधिकृत उमेदवार वैष्णवी धुमाळ यांनाच मतदान करतील, असे त्यांनी सांगितले. विरोधी उमेदवार सोनाली नाईकवाडी सध्या संपर्काबाहेर असल्याचा दावा पिचड यांनी केला. मतदानापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधून गैरसमज दूर केले जातील आणि त्या उमेदवारी मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यात भाजप एकसंघ असून पक्षाने दिलेला उमेदवारच नगराध्यक्ष होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप कार्यालयात पिचड यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा तपशील देण्यास पिचड यांनी नकार दिला. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांकडे अहवाल पाठवून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गटनेतेपदाबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्णयात तमन्ना शेख यांचे नाव असले तरी त्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या बाळासाहेब वडजे हे अधिकृत गटनेते असून त्यांच्या स्वाक्षरीने पक्षाचा व्हीप बजावण्यात आल्याचे पिचड यांनी सांगितले. पिचड यांचा ‘एकतर्फी विजय’चा दावा खरा ठरणार की बंडखोरीचे राजकीय गणित भाजपला धक्का देणार, याचा फैसला मतदानानंतरच होणार आहे. पदाधिकारी-कार्यकर्त् यांची ‘किचन कॅबिनेट’ बैठक भाजप संपर्क कार्यालयात वैभव पिचड यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत काही ठराव एकमताने मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मंडलाध्यक्ष राहुल देशमुख यांनी ठराव वाचून उपस्थितांची संमती घेतली. मात्र, मंजूर ठरावांचा तपशील देण्यास पिचड यांनी नकार दिला.
Source link
एकतर्फी विजयाचा दावा; बंडखोर म्हणतात, निकाल माझ्याच बाजूने:अकोलेत नगरध्यक्षपदासाठी आज मतदान