सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे
.
एकाला 10 लाख दिले, तशीच मदत सर्वांना द्या
खड्ड्यांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा थेट आरोप भुजबळ यांनी केला. “एका मृत्यूसाठी 10 लाख रुपयांची मदत दिली गेली आहे, तशीच मदत इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही मिळाली पाहिजे. पैशांनी जीव परत येत नाही, पण ती मदत महत्त्वाची आहे.नाशिकची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहतूक संथ झाली आहे, ट्रॅफिक जॅम होत आहे. नगरसेवक आणि महापौरही वैतागले आहेत. पाऊस उघडताच ताबडतोब खड्डे भरले पाहिजेत आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे.”
आयुक्त गेडाम आणि कुंभमेळा मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
अधिकारी केवळ एसी ऑफिसमध्ये बसण्यासाठी नसतात, असे सुनावत त्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. “आयुक्त गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. पण त्यांनी हे काम इतरांवर सोडून दिले, तर ते त्यांचे अपयश गणले जाईल. त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाशिकच्या रस्त्यांवर फिरले पाहिजे.काँट्रॅक्ट दिले आणि मोकळे झाले असे चालणार नाही. ठेकेदार काय करतोय हे पाहिले पाहिजे. कुंभमेळा मंत्री (गिरीश महाजन) आणि आयुक्त गेडाम या दोघांनी यात तातडीने लक्ष घालावे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.”
कुंभमेळ्याचं काम सांगून महापालिकेला जबाबदारी झटकता येणार नाही
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुंभमेळा प्राधिकरणाकडे अंगुलिनिर्देश केला जात असल्याच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, “मी स्वतः महापालिकेत होतो, दोन वेळा महापौर होतो. शहरात कुंभमेळा असो वा इतर काही, रस्त्याची, पाण्याची किंवा बांधकामाची अंतिम जबाबदारी महानगरपालिकेचीच असते. एक वीट जरी हलवायची असेल तर महापालिकेची परवानगी लागते. त्यामुळे ‘हे कुंभमेळ्याचं काम आहे’ असं सांगून आयुक्तांना जबाबदारी झटकता येणार नाही.”
“नगरसेवक किंवा महापौरांना ‘एक्झ्युक्युटिव्ह पॉवर्स’ (कार्यकारी अधिकार) नसतात. ते फक्त चर्चा आणि विनंती करू शकतात. प्रत्यक्ष अंमलबजावणीचे अधिकार हे महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्त यांच्याकडेच आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जंकफूड बंदीवर तुकाराम मुंढेंचे कौतुक
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा परिसरात जंकफूडवर घातलेल्या बंदीचे भुजबळांनी स्वागत केले. “बऱ्याच वर्षांनी या विभागाला जाग आल्यासारखं वाटत आहे. सुरुवातीला झगडे साहेब कारवाई करत होते. त्यानंतर तुकाराम मुंढे हे एकमेव असे अधिकारी भेटले आहेत. काहींना वाटेल ते जास्त करत आहेत किंवा काहींना राग येईल, पण इतर देशांतही भेसळीवर अशीच कठोर कारवाई होते आणि ती आपल्याकडे आता सुरू झाली आहे.”
दोषींची गय करणार नाही: गिरीश महाजन
दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे गट) आक्रमक आंदोलनानंतर आणि वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू दुर्देवी आहेत. याला जबाबदार असलेल्या सर्व ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. शनिवारी होणाऱ्या कुंभमेळा बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून कारवाईच्या सक्त सूचना दिल्या जातील,” असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…
नाशकात खड्ड्यांमुळे 5 मृत्यू; ठाकरे गटाचे आंदोलन:दोषींवर कठोर कारवाई होणार; कोणाचीही गय करणार नाही- गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची विदारक स्थिती झाली आहे. त्यामुळे अपघातात ५ जणांनी जीव गमावले. त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी महापालिका प्रशासनाविरोधा आंदोलन केले. खडयांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो सोबत आणत ते महापौर दालनातील खुर्चीवर ठेवण्यात आले. प्रशासन किती जणांचा बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. येथे वाचा संपूर्ण बातमी