![]()
जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण २२७.४ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्याने आतापर्यंत मोसमी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक टप्पा ओलांडला. जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत कायम होता. शहरातील मध्य भागासह सावेडी, भिंगार, केडगाव आणि कल्याण रोड या भागात दुपारपर्यंत पाऊस बरसतच होता. आतापर्यंत अकोले तालुक्यात सर्वाधिक ४८६.३ मिमी (१९०.२ टक्के) पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस शेवगाव ३१.३ मिमी आणि जामखेडमध्ये २४.३ मिमी झाला. अहिल्यानगरमध्ये १४.१, पारनेर ७.८ , श्रीगोंदे २०.९, कर्जत २०.४, पाथर्डी २३.३, नेवासे १२.३, राहुरी ११.१, संगमनेर ६.३, अकोले ५.६, कोपरगाव ११.६, श्रीरामपूर ८.०, राहाता १०.० मिमी पाऊस झाला. मागील २४ तासांत काही मंडळांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. यात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मंडळात सर्वाधिक ५७.० मिमी, श्रीगोंद्यातील काष्टी मंडळात ५१.० मिमी तर जामखेडच्या खर्डा मंडळात ३९.८ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्याच्या एकूण पावसाची आकडेवारी पाहता अकोले तालुक्यातील वाकी मंडळात ८५४.२ मिमी (सरासरीच्या ३४१.३%), शेंडी मंडळात ८००.४ मिमी (३१३.०%), राजूर मंडळात ६००.६ मिमी (२३४.९%) तर साकीरवाडी मंडळात ५१६.१ मिमी (२०१.८%) पावसाची नोंद झाली आहे. ^ बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन ते तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात आले. त्यामुळे दोन दिवस जिल्ह्यात पाऊस झाला. हे वादळ शुक्रवारी रात्री गुजरातकडे गेल्याने जिल्ह्यातील पावसाचा जोर शनिवारपासून कमी होईल. – बी.एन.शिंदे, हवामान तज्ज्ञ. सायंकाळी ६ वाजता भीमा नदीतून दौंड पूल येथे ३२,१०७ क्युसेक, घोड नदीतून घोड धरणात २० हजार, गोदावरी नदीतून नांदूर मधमेश्वर धरणात ४९,३८२ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तर भंडारदरा धरणातून ७,९५१, निळवंडे धरणातून १२,८४९,ओझर बंधाऱ्यातून ६,९०५, क्युसेकने पाणी सोडले.
Source link
मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत रिपरिप:पाऊस सरासरीच्या 50 टक्क्यांवर