Headlines

हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरात "बागुल पंडुगू' उत्साहात:उत्तम आरोग्य अन् सर्वांच्या कल्याणासाठी केली प्रार्थना




शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना भागातील शितळादेवी मंदिर, बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मी माता मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी झाली होती. देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शनानंतर निसर्गाच्या सानिध्यातील सहभोजनाने सण साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी सणाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. सावेडीतील श्रमिकनगर येथे सण अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. श्रमिकनगर येथील शितळादेवी आणि लक्ष्मीमाता या दोन्ही मंदिरांमध्ये पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी, पूजा-अर्चेसाठी व पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पारंपरिक यात्रा उत्सवाचे आयोजन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले होते. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यात्रेचे नियोजन व व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळल्यामुळे संपूर्ण धार्मिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यात्रा उत्सवानिमित्त पोतराजांच्या उपस्थितीत महिलांनी डोक्यावर आकर्षक सजविलेले कलश घेऊन ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात परिसरातून भव्य मिरवणूक काढली. अनेक महिला भगिनींनी आपल्या नवसपूर्तीसाठी डोक्यावर कलश आणत यात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण परिसर जयघोषाने आणि भक्तिरसाने दुमदुमून गेला होता. सणानिमित्त दिवसभर दोन्ही मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला भगिनींनी भक्तिभावाने देवीची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा बागुलू पंडुगू उत्सव यंदाही श्रमिकनगर परिसरात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भाविकांनी घडवले सामाजिक ऐक्याचे दर्शन या यात्रेत सावेडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. बागुलू पंडुगू हा पद्मशाली समाजाचा पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा सण असून तो दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. या दिवशी देवीची विधिवत पूजा करून समाजातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, रोगराईपासून संरक्षण मिळावे, संतुलित पर्जन्यवृष्टीव्हावी, शेती समृद्ध राहावी तसेच समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते,अशी माहिती समाजबांधवांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *