![]()
देशातील तरुण पिढी प्रचंड संतापाच्या अवस्थेत असून, त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात क्रांती अटळ आहे. मेरिटला डावलून निर्णय घेतले गेले, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले आणि तरुणांच्या अपेक्षा दुर्लक्षित राहिल्या, तर व्यवस्थेला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिला. श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे आयोजित ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ राजकीय संपादक यदू जोशी, उद्योजक विक्रम सारडा, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, आजची ‘जेन-झी’ पिढी टोकाच्या भाषेत आपला संताप व्यक्त करत आहे. शिक्षण आणि नव्या पिढीतील दरी वाढत असून, नोटांचे बंडल ठेवले की सर्व काही मिळते, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण होणे हे व्यवस्थेचे अपयश आहे. वाचन चळवळ उभी करणे आणि शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल करणे ही काळाची गरज आहे. प्रमुख वक्ते यदू जोशी यांनीही सध्याच्या राजकारण आणि पत्रकारितेवर परखड भाष्य केले. “जेन-झी अचानक तयार झालेली नाही. त्यांना योग्य दिशा देण्यात सत्ता आणि विरोधक दोघेही अपयशी ठरले आहेत. विरोधकांचा आवाज संपला तर देशात अराजकता निर्माण होईल. हितसंबंध जपत पत्रकारिता करावी लागत असली तरी समाजाप्रती प्रामाणिक राहणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विकास अंत्रे, सचिन गुजर, भाऊसाहेब कांबळे, भानुदास मुरकुटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, तर अशोक निंबाळकर, रियाज देशमुख, मच्छिंद्र देशमुख, दादासाहेब म्हस्के, दिलीप खरात आणि नीलिमा घाडगे यांना वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रिंट मीडियाचे महत्त्व अधोरेखित करताना, सत्य लपवू नका. भारताच्या माध्यम क्षेत्राची अवस्था उत्तर कोरियासारखी होऊ देऊ नका. इतिहास जतन करण्याचे महत्त्वाचे काम आजही वृत्तपत्रेच करतात, असे सांगितले.
Source link
पुरस्कार वितरण:"जेन-झी'च्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहा, अन्यथा क्रांती अटळ