Headlines

अकोले नगरपंचायत निवडणूक:पिचडांच्या बालेकिल्ल्यात बंड यशस्वी; "कमळ विरुद्ध कमळ' लढतीत नाईकवाडींची बाजी




अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपमध्येच ‘कमळ विरुद्ध कमळ’ अशी प्रतिष्ठेची लढत रंगली. माजी नगराध्यक्ष सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी आवाजी मतदानातून ११ मते मिळवत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार वैभव पिचड पुरस्कृत उमेदवार वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा ११-६ अशा पाच मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे अकोले भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता संगमनेर येथून ११ नगरसेवकांना एकाच वाहनातून कडेकोट पोलिस बंदोबस्तात नगरपंचायत सभागृहात आणण्यात आले. पळवा-पळवी आणि दगाफटका टाळण्यासाठी त्यांच्या पुढे-मागे १० ते १२ गाड्यांचा ताफा होता. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता आवाजी मतदान प्रक्रिया सुरू झाली. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत सोनाली नाईकवाडी यांना ११ मते मिळाली, तर वैष्णवी धुमाळ यांना ६ मते मिळाल्याचे स्पष्ट करत उंडे यांनी सोनाली नाईकवाडी यांना विजयी घोषित केले. अकोले नगरपंचायतच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी या निवडणूक कामात सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कृष्णा काळे यांच्यासह ९१ पोलिसांचा फौजफाटा तैनात होता, तसेच नगरसेवकांसाठी १० ते १२ बाऊन्सरही तैनात करण्यात आले होते. मी भाजपचीच नगराध्यक्ष, आम्ही सर्वजण एकत्रित विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी भावनिक झालेल्या दिसल्या. मी भाजपचीच नगराध्यक्ष आहे. आम्ही सर्वजण एकत्रितच आहोत. पुढील सहा महिने अकोल्याच्या विकासासाठी मला सर्व नगरसेवक आणि नागरिकांचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संपूर्ण निवडणुकीमुळे अकोले नगरपंचायतीमधील भाजपमधील अंतर्गत कलह उघड झाला असून, वैभव पिचड यांच्या राजकीय वर्चस्वाला या निकालाने मोठे आव्हान दिल्याची चर्चा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *