![]()
राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत प्रचंड तफावत असल्याचे समोर आले असून, एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध रास्त मागण्यांसाठी तिवसा तहसीलदारांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. शासनाकडून कर्जमाफीबाबत केवळ तोंडी घोषणा केल्या जात आहेत. मुख्यमंत्री, कृषी मंत्री किंवा सहकार आयुक्तांच्या अशा तोंडी वक्तव्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सरकारने प्रत्येक घोषणेचा अधिकृत शासन निर्णय किंवा लेखी आदेश त्वरित काढावा, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने जवळच्या यवतमाळ जिल्ह्यातील भांब येथील ४९ वर्षीय एका शेतकऱ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर धाराशिव येथील जीवन पाटील यांना बँकेने आधी ६० हजार रुपये भरा, तरच २ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगितल्याने ते भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशीच परिस्थिती तिवसा तालुक्यातही पाहायला मिळत आहे. तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी अमोल वावरे, संदीप हगवणे, प्रकाश चिचखेडे, भास्कर कुरळकर, स्वप्नील निस्ताने, विवेक ठाकरे, भूषण गाठे, पुरुषोत्तम मेश्राम, हर्षल मेश्राम, चंदू हगवणे, सुरेश ठाकरे, शेखर वानखडे, पंडित सहारे, संजय ठाकरे, सुभाष नागपुरे, श्याम बेले, गिरिधर राठोड, अंकुश डफळ, गजानन अंबुलकर, गोपाळ चौधरी, भारत धसकट यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कर्जमाफीच्या यादीत दाखवलेली कर्जाची चुकीची आकडेवारी तातडीने दुरूस्त करण्यात यावी. यादीतून सुटलेल्या हजारो पात्र शेतकऱ्यांचा समावेश करून कर्जमाफीची नवीन सुधारित यादी जाहीर करावी. तोंडी घोषणा थांबवून कर्जमाफीबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. जोपर्यंत कर्जमाफीच्या आकड्यांमधील तफावत दूर होत नाही, तोपर्यंत शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत. ही बघा जीवंत उदाहरणे अशी वऱ्हा येथील विनायक शामराव ठाकरे यांच्याकडे ५२ आर जमीन आहे. ५० हजार कर्ज आहे. ते कर्जमाफीसाठी पात्र आहे. परंतु त्यांचे कर्जमाफीच्या यादीत नावच नाही. शेंदोळा बुद्रुकचे भारत पुंडलिकराव धसकट यांचे शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव आहे. मात्र २ लाख ३० हजार रुपये कर्ज असताना केवळ १ लाख ८ हजारांची कर्जमाफी मिळाली आहे. माणिकग्राम धोत्रा येथील विवेक ठाकरे यांच्यावर इंडियन बँकेचे १ लाख ४० हजार कर्ज आहे. मात्र कर्जमाफीच्या यादीत फक्त ४५ हजाराची कर्जमाफी मिळाली आहे. शिरजगाव मोझरीचे उत्तम येरणे यांच्याकडे ९९ हजाराचे कर्ज आहे. परंतु फक्त ५३ हजाराची कर्जमाफी झाली आहे. शिरजगाव येथील युवा शेतकरी देवेंद्र तायवाडे यांच्यावर १ लाख ८ हजार कर्ज आहे, मात्र कर्जमाफी फक्त ५० हजाराची मिळाली आहे.
Source link
कर्जमाफी यादीत घोळ; तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष:तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन, माफ केलेल्या रकमेत तफावत